“...तर राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दिसले असते”; अमोल मिटकरी स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 06:27 PM2023-10-04T18:27:04+5:302023-10-04T18:27:10+5:30
Amol Mitkari And Raj Thackeray: भाषणाने पक्ष मोठा होत नाही, त्यासाठी बूथ बांधणीपासून बळकटीकरण करावे लागते, असे अमोल मिटकरींनी म्हटले आहे.
Amol Mitkari And Raj Thackeray: गेल्या काही महिन्यांपासून राज्यात भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांचे बॅनर लागताना दिसत आहेत. राज्यात अनेक नाट्यमय आणि मोठ्या घडामोडींनंतर शिंदे-फडणवी-पवार सरकार सत्तेत आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहे. एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे.
मध्यंतरी मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, अजित पवार यांच्या सत्तेत सहभागी झाल्यामुळे ती शक्यता धुसर असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी मनसे नेते अभिजित पानसे म्हणाले होते की, मुंबईत मराठी माणूस हरवून गेला आहे. मराठी पाट्यांच्या विषय राज ठाकरेंनी मांडला. मनसेने आंदोलने केली आणि संपूर्ण आढावा घेऊन आम्ही आता पुढे येत आहोत. अनेक लोक बोलली मनसेच्या बाजूने वातावरण आहे. राज ठाकरे लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत आणि त्यासाठी आम्ही काम करायला लागलो आहोत. अभिजित पानसे यांच्यानंतर आता अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले आहे.
...तर राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दिसले असते
भाषणाने पक्ष मोठा होत नाही, त्यासाठी बूथ बांधणीपासून बळकटीकरण करावे लागते. भाषणे केल्याने पक्ष वाढत नाही. जर तसे असते तर राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दिसले असते, असे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आढावा बैठकीत बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, अजित पवारांनी राज्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग सत्तेवर आल्यानंतर यशस्वी केला. रोहित पवार केवळ पुरोगामित्वाच्या गप्पा मारतात. सुप्रिया सुळे अजित दादावर संसदेत टीका करतात. मात्र, अजित दादामुळेच ताई खासदार आहेत, असे अमोल मिटकरींनी सांगितले.
दरम्यान, मी ज्या पक्षात आहे त्या पक्षात जात बघत नाही. मी माझी भाषण शैली पक्षासाठी वापरली. अजित दादांनी मला आमदार करण्याचा शब्द दिला होता. आणि त्यांनी मला आमदार करून तो शब्द पाळला. मी सामान्य कुटुंबातील, मात्र मला पक्षाने आमदार केले. ही या पक्षाची विशेष बाब आहे, असे अमोल मिटकरी यांनी नमूद केले.