“PM मोदींनी काय केले आहे, ते राऊतांनी प्रत्यक्ष जनतेत जाऊन पाहावे”; अजितदादा गटाचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 01:56 PM2023-12-05T13:56:54+5:302023-12-05T14:00:15+5:30
Anil Patil Reaction On Sanjay Raut Statement: २०२४ काय, २०२९ मध्येही मतदान बॅलेट पेपरवर घ्यावे, अशी मागणी संजय राऊत कायम करत राहतील, असा टोला लगावण्यात आला आहे.
Anil Patil Reaction On Sanjay Raut Statement: चार राज्याच्या विधानसभा निवडणूक निकालात तेलंगण वगळता भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. तीन राज्यांत भाजपने मोठा विजय मिळवला. पैकी दोन ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, असे म्हटले होते. याला आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांनी पलटवार केला आहे.
चार राज्यांचा जनादेश समोर आला आहे. तेलंगणा वगळता इतर तीन राज्यांमध्ये वेगळा जनादेश आहे. जनादेशाचे स्वागत करायला हवे. परंतु लोकांच्या मनात शंका आहे. हे कसे शक्य झाले? विशेषतः मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये. लोकांच्या मनात शंका असेल तर ती दूर करावी. बॅलेट पेपरवर एक निवडणूक घ्यावी. फक्त एक निवडणूक घ्यावी आणि संशय दूर करावा, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर अनिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
PM मोदींनी काय केले आहे, ते राऊतांनी प्रत्यक्ष जनतेत जाऊन पाहावे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केलं आहे? हे संजय राऊत यांनी प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन पाहावं. येत्या २०२४ आणि २०२९ च्या निवडणुकीतही संजय राऊत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करतील. जेव्हा एखाद्या पक्षाचा पराभव होतो. तेव्हा जनतेचा जनादेश स्वीकारायला हवा. संजय राऊतांना काहीही कामे नाहीत. संजय राऊतांनी प्रत्यक्ष लोकांमध्ये जावे आणि पंतप्रधान मोदी यांचे काम पाहावे. राजकारण बाजूला ठेवून त्याकडे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल, लोक कोणाबरोबर आहेत. जनता भाजप किंवा एनडीए आघाडीबरोबर उभे आहेत. मात्र, संजय राऊतांचा हा आरोप कायम राहील, अशी टीका अनिल पाटील यांनी केली.
दरम्यान, यापुढे २०२४ आणि २०२९ मध्येही मतदान बॅलेट पेपरवर घ्यावे, अशी मागणी संजय राऊत कायम करत राहतील. पण त्यांनी लोकांमध्ये जावे, लोक काय करतायत आणि त्यांना काय हवे आहे, याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला अनिल पाटील यांनी दिला.