ओबीसी आंदोलनात पक्षाने एकटे पाडले आहे का? भुजबळांचे सूचक भाष्य, “अजितदादा म्हणालेत की...”
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 04:20 PM2023-11-27T16:20:53+5:302023-11-27T16:32:05+5:30
NCP Chhagan Bhujbal: छगन भुजबळ मनोज जरांगेंविरोधात आक्रमक झालेले असताना राष्ट्रवादीतील अन्य कोणताही नेता त्यांच्याबरोबर उभा राहिलेला नाही, असा दावा केला जात आहे.
NCP Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमनेसामने आले आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील सातत्याने करत आहेत. त्याला मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. यातच आता ओबीसी आंदोलनाच्या काळात पक्षाने एकटे पाडले का, असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला होता. यावर भुजबळ यांनी सूचक उत्तर दिले.
मराठा कुणबी व कुणबी मराठा जात प्रमाणपत्रे देण्यासाठी नेमलेली शिंदे समिती व मागील दोन महिन्यांत दिलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा. ज्या सवलती सारथीच्या माध्यमातून मिळतात, त्या ओबीसींनाही द्या, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली होती. या मागणीवर भुजबळ ठाम असल्याचे सांगितले जात आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना, ओबीसी आंदोलनाच्या काळात तुम्हाला पक्षाने एकटे पाडले आहे का, कारण पक्षातील कोणताही नेता तुमच्या बाजूने बोलत नाही, अशी विचारणा छगन भुजबळ यांना करण्यात आली.
माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही, परंतु...
या प्रश्नावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले की, अजित पवार त्या दिवशी म्हणाले, प्रत्येकाने जबाबदारीने बोलले पाहिजे. मीदेखील जबाबदारीने बोलतोय. भाषणांवेळी कागदी पुरावे दाखवतो. हे कागद, हे पुरावे म्हणजे जबाबदारी नाही का? मुळात माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या, अशी आमची मागणी आहे. तसेच माझा झुंडशाहीला विरोध आहे, असे भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, छगन भुजबळ या वयात जातीजातीत दंगली निर्माण करायला लागलेत. सरकार भुजबळांच्या दबावाखाली का येतंय? सरकार नेहमी ओबीसी नेत्याचे ऐकते. काय संबंध आहे? सरकारने ओबीसी नेत्याचे ऐकून गोरगरीब मराठ्यांवर अन्याय करू नका ही हात जोडून विनंती आहे. खूप दिवस खाल्लेय, आता या वयात दंगली भडकवण्याची भाषा करतायेत. भुजबळांची भाषा भयंकर आहे. जातीवाचक शब्दाबद्दल छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करायला हवी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.