“पुलोद सरकार स्थापन केले ते संस्कार, अजितदादा महायुतीसोबत गेले तर गद्दार?”: धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 10:46 PM2024-04-26T22:46:10+5:302024-04-26T22:46:42+5:30
Dhananjay Munde News: शरद पवारांनी भाजपाशी चर्चा केल्या होत्या. शिवसेनेला बाजूला ठेवण्याचा आग्रह केला होता. तुम्ही केले की ते संस्कार आणि अजित पवारांनी केले की गद्दारी, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.
Dhananjay Munde News: लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार केला जात आहे. दोन्ही गट आपली पूर्ण ताकद लावत आहेत. बारामतीची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रचारसभेत बोलताना शरद पवार गटावर जोरदार टीका केली.
२०१७ मध्ये गणेश चतुर्थीला एक बैठक झाली. कुठे बैठक झाली? कशी बैठक झाली? दिल्लीला कुणाच्या घरी बैठक झाली? त्यात काय ठरले? त्या बैठकीचे व्हिडीओ देऊ शकतो. एवढेच काय पण ५३ आमदारांच्या सह्या असलेला कागद मी दाखवू शकतो. अजितदादा दाखवतील की नाही माहिती नाही. पण तशीच वेळ आली तर मी तो नक्कीच दाखवू शकतो. देशातील प्रत्येक कॅमेऱ्यासमोर बोलतोय. प्रत्येकाला उत्तर देण्याची तयारी ठेवून बोलतो. जबाबदारीने बोलतो, असा एल्गार धनंजय मुंडे यांनी केला.
पुलोद सरकार स्थापन केले ते संस्कार, अजितदादा महायुतीसोबत गेले तर गद्दार?
तुम्ही पुलोद सरकार स्थापन केले, ते संस्कार आणि अजित पवार महायुतीबरोबर गेले तर ते गद्दार? शरद पवारांनी भाजपाशी चर्चा केल्या होत्या. शिवसेनेला बाजूला ठेवण्याचा आग्रह केला होता. ते सगळे संस्कार होते, आम्ही निर्णय घेतला तर आम्ही गद्दार? हे दादांनी एकट्याने केले नाही. लोकशाहीचा निर्णय होता. २०१४ मध्ये जे केले ते संस्कार आणि दादाने केले गद्दारी आहे. ही निवडणूक भाऊबंदकीची नाही. देशाचा पंतप्रधान ठरवण्याची ही निवडणूक आहे. देशाचा पंतप्रधान मोदी होतील की इतर कोण? हे ठरवण्याची ही निवडणूक आहे, या शब्दांत धनंजय मुंडे यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, आमच्यासारख्यांनी काही बोलले तर लगेच यांची लायकी आहे का? शरद पवार यांच्या विरोधात बोलणार का? अशी भाषा केली जाते. पण शरद पवार आजही आमचे दैवत आहेत. आजही जाणते राजा आहेत. जाणता राजाला घर नसते. संबंध कुटुंब त्यांचे घर असते. रयत त्याचे घर असते. रयत आणि कुटुंबात निवड करताना कुटुंब निवडायची वेळ का आली, अशी विचारणा धनंजय मुंडे यांनी केली.