“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 04:57 PM2024-09-29T16:57:53+5:302024-09-29T17:01:11+5:30
NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: शरद पवार यांनी मंत्रीपदाचे संकेत दिल्यानंतर आता रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर काही ठिकाणी लागले असल्याचे सांगितले जात आहे.
NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा आणि ओबीसी समाजावरून आंदोलक नेते आक्रमक झालेले असताना, संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीला सशक्त पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी उघडली आहे. यातच आता शरद पवार यांनी रोहित पवार यांना मंत्री करण्याचे संकेत दिले आहेत. यावरून अजित पवार गटातील नेत्यांनी पलटवार केला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, पण रोहित पवार यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. पहिल्याच मंत्रिमंडळात आदित्य ठाकरेंना मंत्रिपदाची संधी मिळाली. आता, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास रोहित पवार यांना मंत्रिपदाची संधी देण्यात येईल, असे संकेत खुद्द शरद पवार यांनी दिले. जामखेड तालुक्यातील खर्डा येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात, रोहित पवार यांनी पाच वर्षे जनतेची सेवा केली आणि पुढील पाच वर्षात ते महाराष्ट्राची सेवा करतील, त्यांना सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात येईल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. त्यानंतर अनेक ठिकाणी रोहित पवारांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर्स झळकले आहेत. यावरून आता प्रफुल्ल पटेल आणि अमोल मिटकरी यांनी रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
शरद पवार आमचे गुरु, आजही आदर कायम, पण...
आम्ही जरी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळे झालो असलो तरी शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात आजही आदर कायम आहे. मी त्यांना आपला गुरु मानतो आणि त्यानुसारच काम करतो. त्यांच्याविषयी माझ्या मनात कोणतीही कटुता नाही, असे सांगत प्रफुल्ल पटेल यांनी रोहित पवार यांच्या मंत्रिबाबत बोलताना त्यांनी खोचक टोला लगावला. जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता येईल तेव्हाच रोहित पवार मंत्री बनतील. प्रत्येक नेते हे त्या क्षेत्रात जाऊन आपला नेता निवडून यावा यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करत असतात. परंतु, त्यांची सत्ता येईल, तेव्हाच ते मंत्री करतील, असा खोचक टोला प्रफुल्ल पटेल यांनी लगावला.
दरम्यान, ज्यांना स्वत: घर सांभाळता आले नाही, ज्यांना स्वत:च्या परिवाराबाबत आदर नाही. ज्यांच्या मनात इतर समाजाबाबत द्वेष आहे, अशा रोहित पवार यांनी आधी आपला मतदारसंघ सांभाळावा. नंतर महाराष्ट्राची स्वप्न बघावी, शरद पवार यांनी जरी मंत्रीपदाचे संकेत दिले असले, तरी रोहित पवार यांची योग्यता आहे का, हे तपासणे आवश्यक आहे, असा पलटवार अमोल मिटकरी यांनी केला.