“४ जूननंतर राजकारणात काही होऊ शकते, शरद पवार भाजपासोबत...”; प्रफुल्ल पटेलांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 05:53 PM2024-04-14T17:53:30+5:302024-04-14T17:53:42+5:30

NCP Praful Patel News: नाशिक आणि सातारा जागेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची भूमिका प्रफुल्ल पटेलांनी स्पष्ट शब्दांत मांडली.

ncp ajit pawar group mp praful patel said anything can happen in politics | “४ जूननंतर राजकारणात काही होऊ शकते, शरद पवार भाजपासोबत...”; प्रफुल्ल पटेलांचे मोठे विधान

“४ जूननंतर राजकारणात काही होऊ शकते, शरद पवार भाजपासोबत...”; प्रफुल्ल पटेलांचे मोठे विधान

NCP Praful Patel News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार भाजपासोबत जाणार होते, असे मोठे विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले होते. त्याचाच पुनरुच्चार प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा एकदा केला आहे. तसेच नाशिक आणि सातारा या दोन जागांबाबत स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे. 

लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पार जागांचे लक्ष्य ठेवले असले तरी इंडिया किंवा महाविकास आघाडीचे नेते भाजपा २०० पार पोहोचू शकणार नाहीत, असे दावे करत आहेत. लोकसभा निवडणुकीचे मतदान सात टप्प्यात होणार असून, ०४ जून रोजी मतमोजणी आहे. यानंतर राजकारणात काही घडू शकते, असा कयास बांधला जात असून, यावर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. राजकीय चर्चांना अप्रत्यक्षरित्या अनुमोदन देत, राजकारणात कधी काही घडू शकते, असे प्रफुल्ल पटेल यांनी नमूद केले.

नाशिक लोकसभेला वेगळा चेहरा देण्याविषयी चर्चा

महायुतीच्या जागावाटपात नाशिक, सातारा यांसह काही जागांवर अद्यापही खल सुरू आहे. यावर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, नाशिक येथे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत. मात्र, यावेळेस वेगळा चेहरा देण्यासंदर्भात चर्चा झाली आणि म्हणूनच छगन भुजबळ यांचे नाव समोर आले. तसेच ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे देण्याबाबत चर्चा करण्यात आली, असे प्रफुल्ल पटेलांनी सांगितले. सातारा जागेसंदर्भात प्रफुल्ल पटेल म्हणाले की, उदयनराजे याआधी आमच्या चिन्हावरच खासदार झाले होते. यंदा आम्ही त्यांना उमेदवारी देऊ शकतो. शेवटी छत्रपती घराणे आहे, प्रसिद्ध चेहरा आहे. मागील वेळेस भूमिका बदलल्यामुळे नागरिकांनी तशी प्रतिक्रिया दिली. पण ते अनेकदा साताऱ्यातून जिंकून आले आहेत. उदयनराजे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. फक्त साताराच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आम्ही तयार आहोत. याबाबतच्या प्रश्नावर आम्ही एक-दोन दिवसांत चर्चा करुन निर्णय घेऊ, असे प्रफुल्ल पटेलांनी नमूद केले. ते मीडियाशी बोलत होते.

दरम्यान, शरद पवार भाजपासोबत येणाच्या आपल्या आधीच्या विधानावर स्पष्टीकरण देताना म्हणाले की, आम्ही त्यावेळी चर्चा केलीच ना. दोनदा शरद पवारांची भेट घेतली. सोबत येण्याची विनंती केली. पाया पडून त्यांचे आशीर्वाद मागितले. बहुतांश पक्ष या बाजूने विचार करत असेल, तर तुम्ही आमच्यासोबत राहिले तर आम्हाला अतिशय आनंद होईल. तुमच्या मार्गदर्शनामध्येच आम्ही काम करु इच्छित आहोत, असे सांगितले. तेव्हा शरद पवार अनुकूल असल्यासारखे वाटले. पुण्यातील उद्योजकाच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची एक बैठक झाली. जयंत पाटील या बैठकीत होते. यायचे नव्हते तर बैठक कशासाठी झाली? काहीतरी विचार होता. वेगळे झाल्यानंतर परत चर्चा कशी? समाधन होत असेल तर प्रयत्न करायचे. राजकारणात काहीही होऊ शकते. आमची भूमिका नरेंद्र मोदी यांना साथ देण्याची आहे, असे पटेल म्हणाले.
 

Web Title: ncp ajit pawar group mp praful patel said anything can happen in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.