Maharashtra Politics: “न्यायदेवता न्याय देईलच, हे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”; अमोल मिटकरींचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 02:13 PM2022-09-27T14:13:03+5:302022-09-27T14:14:04+5:30
Maharashtra News: सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरींनी शिंदे-भाजप सरकार कोसळण्याची नवी तारीख दिली आहे.
Maharashtra Politics: शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात २७ सप्टेंबर रोजी होत आहे. या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचे आणि देशाचेही लक्ष लागले आहे. एकीकडे शिंदे गटात असलेल्या आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय न्यायालयाकडू अपेक्षित असताना दुसरीकडे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे? या वादावरही निर्णय येण्याची शक्यता आहे. यातच आता राष्ट्रवाद काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकार कधी कोसळणार, याची नवी तारीख देत मोठा दावा केला आहे. याशिवाय न्यायदेवता न्याय देईलच, असा विश्वासही मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे कामकाजाचे लाइव्ह प्रक्षेपण सुरू झाल्यामुळे सर्वांनाच ही सुनावणी थेट पाहता येत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जर शिंदे गटातील आमदार अपात्र ठरले, तर पुढे काय घडणार? याचीही चर्चा जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
हे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल
सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील आमदार अपात्र ठरले, तर राज्यात काय घडणार? याची चर्चा सुरू झालेली असताना असे झाले तर पुढच्या १० दिवसांत राज्यातील सरकार कोसळेल, असा दावा अमोल मिटकरींनी केला आहे. अमोल मिटकरींनी ट्वीटमध्ये न्यायालयात सध्या सुरू असलेल्या सुनावणीचा संदर्भ दिला आहे. १६ आमदार अपात्र ठरल्यास हे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल. न्यायदेवता न्याय देईलच, असे ट्विट अमोल मिटकरींनी केले आहे.
दरम्यान, या सुनावणी ठाकरे गटाच्या वकिलांनी वारंवार शिंदे गटाला इतर पक्षात विलीनकरण करण्यापासून पर्याय नाही. मूळ याचिका निकाली काढल्याशिवाय निवडणूक चिन्हाबाबत आयोगाने निर्णय घेऊ नये याबाबत युक्तिवाद केला. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी तब्बल दीड तास युक्तिवाद केला.