Maharashtra Political Crisis: “शिंदेसाहेबांचे मनापासून आभार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ‘पीए’ म्हणून ठेवले”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 01:01 PM2022-07-17T13:01:46+5:302022-07-17T13:02:40+5:30
Maharashtra Political Crisis: ठाकरे सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः माइक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्यायचे, असे सांगत अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
अकोला: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यापासून महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. तर, काही स्थगित केलेले निर्णय पुन्हा कार्यान्वित करताना पाहायला मिळत आहे. यावरून महाविकास आघाडीकडून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानतो, कारण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी ‘पीए’ म्हणून ठेवले, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी लगावला आहे.
गेल्या काही दिवासांपासून अमोल मिटकरी सातत्याने शिंदे-फडणवीस सरकार, भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना पाहायला मिळत आहेत. अकोला येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. ठाकरे सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः माइक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्यायचे, पण आताचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माइक खेचायला लागले आहेत. पुढे काय काय खेचतील सांगता येत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मानतो, कारण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी ‘पीए’ म्हणून ठेवले, या शब्दांत अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
राज्याला कृषीमंत्री नाही यापेक्षा दुर्दैव काय असू शकते
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल. त्यानंतर हे सरकारच टिकणार नाही, असा दावा करत जिल्ह्यांत संततधार पाऊस झाला. जिल्ह्याला पालकमंत्री नाही. राज्याला कृषीमंत्री नाही, मग हे सरकार झोपा काढण्यासाठी आले आहे का, या सरकारला थोडीशी लाज लज्जा शरम असेल, तर गावात येऊन पाहावे. अजूनही या राज्याला कृषीमंत्री नसेल, तर या सरकारचा आम्ही धिक्कार करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली.
दरम्यान, विद्यमान आघोरी सरकारकडून आततायीपणाचा निर्णय. थेट सरपंच देणे हा एक अयशस्वी प्रयोग असुन ७३ व्या घटनादुरुस्ती नुसार निवडून आलेल्या सदस्यांनीच सरपंच उपसरपंच निवडुन देणे योग्य आहे. तीच खरी लोकशाही आहे. महाराष्ट्र सरकारकडून लोकशाहीचा खून, अशी टीका अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरून केली होती. यासोबत लोकशाही वाचवा असा हॅशटॅग सुद्धा दिला.