“...तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही”; अमित शाहांचा उल्लेख करत राष्ट्रवादीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 10:14 AM2023-06-20T10:14:53+5:302023-06-20T10:17:09+5:30
NCP Amol Mitkari News: ज्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा भाजप-शिंदे गटात मारामाऱ्या झालेल्या दिसतील, असा दावा करण्यात आला आहे.
NCP Amol Mitkari News: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी जय्यत तयारीला सुरुवात केली आहे. यातच राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्ली दौरे वाढलेले पाहायला मिळत आहे. यातच मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, यावरून तर्क-वितर्क केले जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठा दावा केला आहे.
मागील अनेक दिवसांपासून शिवसेना शिंदे गटातील नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विविध तारखा सांगितल्या जात आहेत. मात्र, अद्यापही हा मंत्रीमंडळ विस्तार खोळंबलेला आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अब्दुल सत्तारांबद्दल केंद्रात प्रचंड नाराजी
अमोल मिटकरी म्हणाले की, अमित शाहांनी सांगितले आहे की, तुमच्या मंत्रिमंडळातील संजय राठोड, संदीपान भुमरे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार व गुलाबराव पाटील या वादग्रस्त मंत्र्यांना आवर घाला किंवा या मंत्र्यांची हकालपट्टी करा. त्याशिवाय आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करणार नाही. यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत. विशेषतः अब्दुल सत्तारांबद्दल केंद्रात प्रचंड नाराजी आहे, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला. तसेच एकनाथ शिंदे या मंत्र्यांची हकालपट्टी करत नाहीत. या मंत्र्यांमुळे भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याचा सूर भाजपमधील नेत्यांचा आहे. १० मंत्रीपदं आम्ही देऊ आणि कुणाला मंत्रीपद द्यायचे याचे अधिकार एकनाथ शिंदेंना असतील, असे भाजपकडून सांगण्यात आले आहे, असे अमोल मिटकरींनी म्हटले आहे.
दरम्यान, याचा अर्थ पाच मंत्र्यांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत भाजपाकडून मंत्रिमंडळाच्या विस्ताराला ब्रेक लागला आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ज्या दिवशी मंत्रीमंडळ विस्तार होईल तेव्हा दोन्ही गटात मारामाऱ्या झालेल्या दिसतील, या शब्दांत अमोल मिटकरींनी निशाणा साधला.