शरद पवारांचे फोटो लावण्यावरून वाद; अमोल मिटकरींनी जितेंद्र आव्हाडांना चांगलेच खडसावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 10:36 AM2023-07-05T10:36:12+5:302023-07-05T10:41:45+5:30
Amol Mitkari Vs Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचा फोटो वापरण्यावरून कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
Amol Mitkari Vs Jitendra Awhad:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर कुणाकडे किती आमदार, याबाबत सस्पेन्स कायम आहे. शरद पवार आणि अजित पवार गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. दोन्ही गटांकडून बोलावलेल्या बैठकीत कुणाकडे किती आमदार याचे चित्र स्पष्ट होऊन कोण ‘पॉवर’बाज हेही स्पष्ट होणार आहे. यातच आता शरद पवार यांचे फोटो बॅनरवर लावण्यावरून अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाडांना चांगलेच खडसावल्याचे सांगितले जात आहे. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेच्या प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवर शरद पवार यांचे फोटो लावावेत, अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. यावर, मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनीच आमचे फोटो वापरावे. ज्यांनी आमच्या विचारसरणीचा विश्वासघात केला, त्यांनी माझा फोटो वापरू नये. माझा फोटो कुणाला वापरू द्यायचा, हा माझ्या हयातीत तरी माझाच निर्णय आहे, असे स्पष्ट करत शरद पवार यांनी पलटवार केला. यावर जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरींध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड?
महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शरद पवारांचा फोटो वापरला होता. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, जिवंत माणूस जेव्हा सांगतो, माझे फोटो वापरायचे नाहीत. तर, विषय संपला. तुमच्याकडे आहेत, ना तुमचे राष्ट्रीय नेते दिल्लीचे वगैरे. त्यांचे फोटो वापरा. शरद पवार कशाला पाहिजेत?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. यावर अमोल मिटकरी यांनी पलटवार केला. शरद पवार जितेंद्र आव्हाडांची खासगी मालमत्ता नाही आहेत. शरद पवार सर्वांचे आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी अशी वक्तव्ये करू नयेत, या शब्दांत अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, जास्तीत जास्त आमदार, पदाधिकारी आपल्याकडे असल्याचा दावा अजित पवार गट करत आहे. तर आपल्याकडेच जास्त संख्याबळ असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकांमधून कोणाकडे किती ताकद हे स्पष्ट होणार आहे. एकमेकांच्या मांडीला मांडी लावून काम करणारे कार्यकर्ते दोन गटात विभागले आहेत. त्यामुळे शिवसेनेसारखी स्थिती राष्ट्रवादीत निर्माण झाली आहे.