Amol Mitkari : "काय ते मंत्री? काय त्यांचे नाव? आणि काय त्यांचा दौरा?"; आरोग्य मंत्र्यांवर राष्ट्रवादीची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 10:22 AM2022-08-28T10:22:53+5:302022-08-28T10:33:00+5:30
NCP Amol Mitkari Slams Tanaji Sawant : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला आहे.
मुंबई - शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना त्यांच्या मुंबई-पुणे-मुंबई दौऱ्यावरुन सध्या सोशल मीडियात चांगलंच ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियावर त्यांच्या दौऱ्याचे फोटोही व्हायरल होत असून घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर, तसेच राखीव असा हा दौरा असल्याचे दिसून येते. पुण्यातील या कार्यालयातून त्या कार्यालयात आणि त्या कार्यालयातून घरात, अशा आशयाचं वेळापत्रक पाहून नेटीझन्सने त्यांची चांगलीच फिरकी घेतली आहे. याच दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसने आरोग्य मंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे.
"काय ते मंत्री? काय त्यांचे नाव? आणि काय त्यांचा दौरा?? एकदम OKK OKK" म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (NCP Amol Mitkari) यांनी निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "हे आहेत आमचे आरोग्य मंत्री! एकट्या पुणे शहरात एकाच दिवसात हजारो किलोमीटरचा दौरा करण्याचा नवा विक्रम!! काय ते मंत्री? काय त्यांचे नाव? आणि काय त्यांचा दौरा?? एकदम OKK OKK" असं अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
हे आहेत आमचे आरोग्य मंत्री ! एकट्या पुणे शहरात एकाच दिवसात हजारो किलोमीटरचा दौरा करण्याचा नवा विक्रम !!
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 27, 2022
" काय ते मंत्री ? काय त्यांचे नाव ? आणि काय त्यांचा दौरा ??
एकदम OKK OKK pic.twitter.com/vWDIVntqlU
'घर ते कार्यालय' दौऱ्याच्या परिपत्रावरुन मंत्री सावंत ट्रोल
राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी तानाजी सावंत यांच्या दौऱ्यावरुन टीका केली आहे. "किती कामाचा दौरा आहे पहा, महाराष्ट्राचे वाटोळे करणारे हेच अडाणी लोक. घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर" असे म्हणत रुपाली पाटील-ठोंबरे यांनी तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, तानाजी सावंत यांच्या ३ दिवसीय दौऱ्याचं परिपत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यानुसार, २६ ऑगस्ट रोजीचा दौरा हा मुंबईहून पुणे येथे आगमन, निवासस्थानी मुक्काम एवढाच आहे. तर, २७ ऑगस्ट रोजी निवासस्थान येथून पुण्यातील बालाजी नगर कार्यालय, तेथून कात्रज येथील कार्यालय. त्यानंतर, कात्रजच्या कार्यालयातून बालाजी नगर कार्यालय आणि येथून पुन्हा कात्रज निवासस्थान असा त्यांचा दौरा असणार आहे.
पुण्यात डेंग्यू आणि ताप साथीचे रुग्ण
संपूर्ण दिवसभरात ते फक्त घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर तेही पुण्यातच असणार आहेत. त्यावरुन, आता त्यांना पुणेकरांनी ट्रोल केलं आहे. पुण्यात सध्या डेंग्यू आणि ताप साथीचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे, रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढत असताना सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे काही ठोस निर्णय घेतील, आरोग्य विभागाच्या बैठका घेतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांचा दौरा पाहून पुणेकरांची निराशाच झाली आहे. दरम्यान, तानाजी सावंत हे शिंदे गटातील प्रमुख आमदारांपैकी एक असून पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात त्यांची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक आरोग्यमंत्री या महत्त्वपूर्ण खात्याची जबाबदारी शिंदे सरकारने त्यांच्यावर सोपवली आहे.