Maharashtra Political Crisis: “‘५० खोके एकदम ओके’ हे चांगलंच झोंबलेलं दिसतंय”; अमोल मिटकरींचा शिंदे-भाजप सरकारला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 01:22 PM2022-08-20T13:22:52+5:302022-08-20T13:23:50+5:30
Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मुद्द्यांवरून विरोधी बाकावर बसलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने निशाणा साधला जात आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार गरिबांसाठी असून, सर्वसामान्यांना न्याय देणार असल्याचा विश्वास दिला जात आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. ‘५० खोके एकदम ओके’ हे चांगलेच झोंबलेले दिसतेय, असा खोचक टोला अमोल मिटकरींनी लगावला आहे.
सध्या शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचे सुरुवातीचे दोन दिवस विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विविध मुद्द्यांवरून आंदोलन करत सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभेतही विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना सत्ताधारी सदस्यांची भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले. यावरूच अमोल मिटकरी यांनी सरकावर टीका केली आहे.
‘५० खोके एकदम ओके’ हे चांगलंच झोंबलेलं दिसतंय
अमोल मिटकरींनी केलेल्या एका ट्विटमध्ये, सत्ताधाऱ्यांना वारंवार सांगावे लागते आहे, हे सरकार गोर गरिबांसाठी काम करते आहे, हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, याचं कारण "५० खोके एकदम ओके" हे चांगलच झोंबलेलं दिसतंय, असा टोला लगावला आहे. तत्पूर्वी, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर, शिंदे गटाच्या बंडाचे केंद्र असलेल्या गुवाहाटीचा संदर्भ देत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घोषणा दिल्या. गद्दारांना भाजपची ताट-वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी!, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.
दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केलेल्या घोषणांनी विधिमंडळ परिसर दुमदुमुन निघाला. ५० खोके एकदम ओके!, रोक घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो!, सुधीरभाऊंना चांगलं खातं न सरकारचा धिक्कार असो!, अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी यावेळी सरकारचा निषेध केला. आले रे आले गद्दार आले, असे म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला.