Maharashtra Political Crisis: अमोल मिटकरींचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना खरमरीत पत्र; म्हणाले, “संविधानाचा सन्मान...”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 05:40 PM2022-07-07T17:40:55+5:302022-07-07T17:41:42+5:30
Maharashtra Political Crisis: आपली भूमिका नेहमी संशयाच्या भोवऱ्यात राहिल्याचे सांगत अमोल मिटकरी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला.
अकोला: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोपही तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने राज्यपालांना दिलेल्या १२ आमदारांच्या नियुक्ती प्रस्तावाबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. यातच आता नव्या शिंदे सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नवी यादी सादर करण्याची तयारी केल्याचे सांगितले जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्यपालांना एक पत्र लिहून त्यातून टोला लगावला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी अमोल मिटकरी यांनी राज्यपालांना एक पत्र दिले आहे. यामध्ये, कोरोनानंतरच्या काळात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलपती म्हणून दीक्षांत समारंभाला आपण स्वतः हजर राहत आहात. विद्यापीठ सदस्य म्हणून आपणास भारतीय संविधानाची प्रत देऊन सन्मानित करताना आनंद होत असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
आपण अनेकदा घटनाबाह्य वागलात
आपल्या देशातील लोकशाही, समता, स्वातंत्र्य व बंधुता ही मूल्य संविधानात आहेत. पी. सी. अलेक्झांडर हे लोकांचे राज्यपाल म्हणून महाराष्ट्राच्या जनतेस आजही स्मरणात आहेत. आपण शिवप्रेमी आहात. संविधान प्रेमी असाल, याबाबत मी तरी आशावाद आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपण अनेकदा घटनाबाह्यच वागलात, असे मत विविध घटनातज्ज्ञांनी व्यक्त केले. मग घाईघाईत केलेली फ्लोअर टेस्ट, राजकारण्यांना भरवलेले पेढे, १२ आमदारांची प्रलंबित यादी यामुळे आपली भूमिका वारंवार संशयाच्या भोवऱ्यात येत होती. तरीही आपण संविधानाचा सन्मान करत असाल, याबाबत मला शंका नाही, असे मिटकरी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण
आपण शिवनेरी व रायगड स्वतः चढून गेलात, हा प्रत्येक माणसासाठी अभिमानाचा क्षण होता. छत्रपती शिवरायांचाच विचार भारतीय राज्यघटनेत आला आहे. तिचे पालन व संरक्षण आपण निश्चितच करावे, या अपेक्षेपोटी आपणास ही संविधानाची प्रत देताना आनंद होत आहे. आपणास नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा, असे सांगत अमोल मिटकरी यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.