“भाजपकडून ओबीसी समाजावर नेहमी अन्याय, आरक्षणाच्या आश्वासनाचे काय झाले?”; राष्ट्रवादीची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 01:43 PM2023-06-27T13:43:23+5:302023-06-27T13:48:36+5:30
ओबीसींचे राजकीय आरक्षण संपविण्याचा विडाच भाजपने उचला आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
Anil Deshmukh News: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपकडूनच ओबीसी समाजावर नेहमी अन्याय झाला आहे. सत्तेत येताच तीन महिन्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण देऊ, असे आश्वासन देण्यात आले होते, त्याचे काय झाले, अशी विचारणा अनिल देशमुख यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीकडून ओबीसींचा केवळ वापर होत आहे, असा दावा करण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेले मत चुकीचे आहे. त्यांनी संपूर्ण माहिती घ्यावी आणि नंतरच वक्तव्य करावे. राष्ट्रवादीने ओबीसींसह इतर समाजाला नेहमीच बरोबर घेतले. ओबीसी समाजातील नेत्यांना पक्षात महत्वाची पदे आणि सरकारमध्ये महत्वाची खातीसुध्दा दिली आहेत. उलट भाजपाकडूनच ओबीसी समाजावर नेहमी अन्याय होत असल्याचे सर्वत्र चित्र आहे. भाजप सत्तेत येताच तीन महिन्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण देऊ, असे आश्वासन देणारी भाजप आता एक वर्षांपासून सत्तेत आहे. आता त्या आश्वासनाचे काय झाले? उलट ओबीसींचे राजकीय आरक्षण संपविण्याचा विडाच भाजपने उचला आहे, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला.
जवळपास साडेतीनशे जातींची संपूर्ण आकडेवारी समोर येईल
ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. जर ही जनगणना झाली तर ओबीसींमध्ये येणारे कुणबी, तेली, माळी यांच्यासह इतर जवळपास साडेतीनशे जातींची संपूर्ण आकडेवारी समोर येईल आणि त्यानुसार त्यांना शासकीय योजनांचे लाभ होतील. ओबीसी समाजातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळू नये यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत. ओबीसी महामंडळाला सध्याच्या शिंदे–फडणवीस सरकारने केवळ ५५ कोटी रुपये दिले. राज्यात जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा वित्त खाते अजित पवार यांच्याकडे होते आणि त्यांनी जवळपास २५० कोटी रुपये दिले होते. २०१४ च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देवू असे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले, असा सवालही अनिल देशमुखांनी केला.