धनंजय महाडीक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर, मुंबईत घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 05:26 PM2019-03-14T17:26:04+5:302019-03-14T17:30:36+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार धनंजय महाडीक यांनाच अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. गुरुवारी दुपारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत ११ जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिल्याच यादीत महाडीक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने कोल्हापुरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार धनंजय महाडीक यांनाच अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. गुरुवारी दुपारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत ११ जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिल्याच यादीत महाडीक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने कोल्हापुरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यातून टोकाचा विरोध असतानाही पक्षाचे नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यामुळे महाडीक यांना उमेदवारी मिळाली आहे, आता प्रत्यक्ष निवडणूकीत राष्ट्रवादी किती प्रामाणिक राहते आणि महाडीक गट काय जोडण्या लावतो यावर निकाल अवलंबून राहणार असल्याने याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.
खासदार महाडीक हे २0१४ मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदार झाले, पण त्यानंतर त्यांनी भाजपशी जास्त जवळीक केल्याने त्यांना उमेदवारी देउ नये अशी कोल्हापुरातून टोकाचा विरोध झाला. खुद्द शरद पवार यांच्या समोर झालेल्या बैठकीत दोन वेळा त्यांच्याविरोधात घोषणाबाजी झाली होती, त्यांच्या तक्रारींचा अहवालही वरिष्ठांकडे पाठवला गेला होता, पण पक्षाचे नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी महाडीक यांचे असलेले कौटूंबिक व निकटचे संबंध यामुळे या तक्रारीकडे दुर्लक्ष केले गेले. उलट राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्त्याची समजूत काढण्यात आली.
दरम्यानच्या काळात टोकाचा विरोध होत असल्याने महाडीक यांनी शिवसेनेची उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मदतीने भाजपकडे जागा घेउन उमेदवारी मिळवण्याचाही प्रयत्न केला, पण उध्दव ठाकरे यांनी नकार दिल्याने त्यांनी राष्ट्रवादीतच सर्वांशी जुळवून घेण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांना ज्यांनी विरोध केला ते आमदार हसन मुश्रीफ व शहाराध्यक्ष आर.के.पोवार यांच्यासह के.पी.पाटील यांनाही आपल्यासोबत घेत महिला मेळाव्यातून प्रचाराला सुरुवात केली आहे.
२00९ मध्ये धनंजय महाडीक यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी केली होती, पण त्यावेळी पवार यांनी आपले वजन संभाजीराजे यांच्या पारड्यात टाकले. यावेळी विद्यमान खासदार सदाशिवराव मंडलीक यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत संभाजीराजे यांचा पराभव केला होता. यावेळी महाडीक यांनी मंडलीक यांना मदत करत आपली ताकद दाखवून दिली होती. याच ताकदीच्या जोरावर त्यांनी २0१४ ची पक्षाची उमेदवारी आमदार मुश्रीफ यांच्या मदतीने आपल्या पदरात पाडून घेतली.