राज्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच मोठा पक्ष
By admin | Published: January 5, 2015 04:35 AM2015-01-05T04:35:39+5:302015-01-05T04:35:39+5:30
राज्यातील दोन्ही सभागृहासह लोकसभेतही राष्ट्रवादीचेच अधिक सदस्य असल्याचा दाखला देत आता आम्ही काँग्रेसच्या बरोबरीत नाही
शिर्डी (अहमदनगर) : राज्यातील दोन्ही सभागृहासह लोकसभेतही राष्ट्रवादीचेच अधिक सदस्य असल्याचा दाखला देत आता आम्ही काँग्रेसच्या बरोबरीत नाही तर त्यांच्यापेक्षा मोठे आहोत, असे साई दर्शनासाठी आलेले राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले़
निवडणुकांपूर्वी आम्हाला बरोबरीत स्थान न देणाऱ्या काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. राष्ट्रवादीची भ्रष्टाचारी अशी प्रतिमा बनवण्यासाठी ‘कॅम्पेनिंग’ राबवण्यात आले, त्यात काँग्रेसनेही मदत केली, असा सांगत आरोप करणारे विरोधकच आता राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांची चौकशी करीत असल्याने सत्य जगासमोर येईल व पक्षाची प्रतिमा उजळून निघेल़ त्यामुळे आम्ही या चौकशीचे स्वागतच करतो, असेही ते म्हणाले. पटेल यांनी रविवारी माध्यान्ह आरतीनंतर साई दरबारी सहकुटुंब हजेरी लावली़ त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, मी ‘पीके’चित्रपट पाहिला असून त्यात आक्षेपार्ह काहीही नसल्याचे त्यांनी सांगितले़ देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे़ त्यामुळे ज्यांना आक्षेप असेल त्यांनी तोडफोडीऐवजी न्यायालयात दाद मागावी. या चित्रपटात भाष्य केलेले आहे. त्यात कोणत्या धर्माचा अवमान होतो, असे आपणास वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)