राष्ट्रवादीचा जन्मच नैसर्गिक नाही; काँग्रेसमधून बाहेर पडलेला पक्ष, मुनगंटीवार यांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 02:42 AM2018-09-05T02:42:57+5:302018-09-05T02:43:24+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच नैसर्गिक नाही, काँग्रेसमधून बाहेर पडलेला हा पक्ष आहे. त्यामुळे भाजपाबद्दल बोलण्याचा त्यांना अधिकारच नाही, असा टोला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी लगावला.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच नैसर्गिक नाही, काँग्रेसमधून बाहेर पडलेला हा पक्ष आहे. त्यामुळे भाजपाबद्दल बोलण्याचा त्यांना अधिकारच नाही, असा टोला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी लगावला. विधान परिषदेचे विद्यमान विरोधी पक्ष नेते भाजपात होते. भाजपाचे गुणगान करत होते, ते राष्टÑवादीत आलेले त्यांना चालतात. मात्र राष्ट्रवादीचे विचार पटले नाहीत म्हणून कोणी भाजपात आले की यांना पोटशूळ होतो, असा चिमटाही मुनगंटीवार यांनी काढला.
महामंडळाच्या नियुक्त्या झाल्या, तसाच मंत्रिमंडळ विस्ताराचाही मुहूर्त येईल. नरेंद्र पाटील यांचा भाजपाकडे कल असण्यावर राष्टÑवादीने आक्षेप घेतला आहे. राष्टÑवादीचा विचार पटला नाही म्हणून ते भाजपात आले. त्यांच्या क्षमतेचा उपयोग करण्यासाठी त्यांना समितीचे पद दिले गेले आहे. राष्ट्रवादी लोकांच्या विस्मरणाचा फायदा घेते, असे त्यांनी सांगितले.
पक्षात बाहेरून आलेल्यांना पदे दिली जातात आणि वर्षानुवर्षे पक्षाचे कार्य करणाऱ्यांना उपाशी ठेवले जाते, हे योग्य आहे का? असे विचारता मुनगंटीवार म्हणाले, भाजपाची सदस्य संख्या कोटींच्या घरात आहे आणि सर्वांना पद देणे शक्य नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपाचा कार्यकर्ता पदासाठी काम करीत नाही. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, चंद्रकांतदादा असे कार्यकर्ते आहेत, जे पुढच्या जन्मातही भाजपातच राहतील.
‘संघर्ष जनतेसाठी नसून सत्तेसाठी’
काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेवर मुनगंटीवार यांनी टीका केली. ते म्हणाले, जातीय द्वेष निर्माण करण्याचा राजकीय प्रयत्न विरोधकांनी केला. मात्र जळगाव व सांगलीच्या निवडणुकांतून जनतेचा विश्वास भाजपावर आहे, हे स्पष्ट झाले. काँग्रेसचा संघर्ष सत्ताप्राप्तीसाठी आहे. स्वत:च्या १५ वर्षांबद्दल काँग्रेस काहीच बोलत नाही. त्या काळात जे पराक्रम केले, ते लक्षात घेता कितीही यात्रा काढल्या तरी मंत्री होण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही.