काँग्रेस फोडण्याचा ‘राष्ट्रवादी’चा डाव

By Admin | Published: July 16, 2016 12:43 AM2016-07-16T00:43:18+5:302016-07-16T00:43:18+5:30

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात एकेकाळी महत्त्वाचे स्थान, भूमिका असणाऱ्या काँग्रेस पक्षाची प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यानंतर पीछेहाट झाली आहे

'NCP' to break Congress | काँग्रेस फोडण्याचा ‘राष्ट्रवादी’चा डाव

काँग्रेस फोडण्याचा ‘राष्ट्रवादी’चा डाव

googlenewsNext

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात एकेकाळी महत्त्वाचे स्थान, भूमिका असणाऱ्या काँग्रेस पक्षाची प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यानंतर पीछेहाट झाली आहे. राज्य आणि दिल्लीतील काँग्रेस नेत्यांचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे. राष्ट्रवादी आणि भाजपाकडून काँग्रेस फोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या सत्ताकारणात काँग्रेसचे योगदान मोलाचे आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रखर विरोध करण्यासाठी नेत्यांचे पाठबळ मिळत नसल्याने दिवसेंदिवस काँग्रेसची पीछेहाट होऊ लागली आहे.
प्रा. रामकृष्ण मोरे असताना सत्तेत समान सहभाग असायचा. पक्षीय बलाबलानुसार पदेही मिळत असत. मात्र, प्रा. मोरे सरांचे निधन झाल्यानंतर काँग्रेसची ताकद कमी होत गेली आहे. सरांनंतर एक गट राष्ट्रवादीत समाविष्ट झाला, तर दुसरा गट शिवसेनेत गेला. काँग्रेसला गळती सुरू झाली.
त्यातच राज्यातील सत्तेची समीकरणे जपण्याच्या नादात राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांकडून पिंपरीतील काँग्रेसकडे दुर्लक्ष झाले, हे वास्तव आहे. सत्ता असतानाही पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण समिती झाली नाही.
साधी कार्यकारी दंडाधिकाऱ्याचीही नियुक्ती झाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ देण्याऐवजी त्यांचे मानसिक खच्चीकरण कसे होईल, याकडे पक्षश्रेष्ठींचे लक्ष असल्याची भावना कार्यकर्त्यांची झाली आहे.
पक्षात न्याय मिळत नसल्याने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी राजीनामा दिला. त्यानंतर सचिन साठे यांची शहराध्यक्षपदी निवड झाली. या दोन्ही गटांची मने अजूनही न जुळल्याने त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये सतत धुसफूस होत असल्याचे दिसून येते. स्थायी समितीतील सदस्य निवड असेल किंवा विविध समिती सभापती, विरोधी पक्षनिवडीत डाव-प्रतिडावाचे, शह-काटशह देण्याचे राजकारण सुरूच आहे.
राष्ट्रवादी, भाजपा गळ टाकून
पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेस नगरसेवकांची संख्या १३ आहे. त्यात भोईर गटाचे वर्चस्व अधिक आहे. त्यामुळे भोईर गटाला फोडण्यासाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचे नगरसेवक भाजपा, राष्ट्रवादीच्या वाटेवर, अशी आवई उठविली जात आहे. मात्र, ‘काँग्रेस सोडणार नाही, अशी भूमिका भोईर गटाची आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षबांधणीवर त्यांचा कटाक्ष असून, पिंपरी-चिंचवडमधील काँग्रेस फुटू नये, म्हणून त्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. प्रयत्न करण्याची गरज आहे. भोईर-साठे यांचे मनोभेद मिटविण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'NCP' to break Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.