राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार धनराज महाले पुन्हा शिवसेनेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 12:24 PM2019-08-16T12:24:46+5:302019-08-16T12:27:53+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीत महाले पुन्हा एकदा दिंडोरी मतदारसंघातून निवडणूक लढविताना दिसू शकतात. धनराज महाले हे समाजवादी नेते आणि माजी खासदार दिवंगत हरीभाऊ महाले यांचे चिरंजीव आहेत.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिंडोरी मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविणारे धनराज महाले पुन्हा एकदा स्वगृही अर्थात शिवसेनेत परण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महाले यांचा पराभव झाला होता. महाले शिवसेनेचे माजी आमदार आहेत. आता महाले पुन्हा शिवसेनेत परतणार असल्याने राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार आहे.
राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढविणारे अनेक नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यात आता धनराज महाले यांचे नाव सामील झाले आहे. याआधी अहमदनगरचे उमेदवार संग्राम जगताप हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवार संजयमामा शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे ते देखील भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे.
२०१४ मध्ये धनराज महाले यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी २०१९ मधील लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. परंतु, दिंडोरी मतदार संघ युतीत भाजपकडे असल्यामुळे महाले यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकत असल्यामुळे दिंडोरीतून आपण निवडून येऊ असा अंदाज महाले यांना होता. परंतु, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या भारती पवार यांनी महाले यांना पराभूत केले. भारती पवार यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. परंतु, त्यांनी भाजपमध्ये जावून अखेर दिल्ली गाठलीच.
दरम्यान धनराज महाले पुन्हा शिवसेनेत जाणार असल्याचे समजते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाले पुन्हा एकदा दिंडोरी मतदारसंघातून निवडणूक लढविताना दिसू शकतात. धनराज महाले हे समाजवादी नेते आणि माजी खासदार दिवंगत हरीभाऊ महाले यांचे चिरंजीव आहेत.