Maharashtra Politics: “शरद पवारांना टार्गेट करण्यासाठीच आंदोलन, आता तुमचं सरकार आहे, STचं विलिनीकरण करुन दाखवा”
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 02:37 PM2022-11-05T14:37:17+5:302022-11-05T14:38:07+5:30
Maharashtra News: एसटी महामंडळाचे विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी आता तुमचे मोर्चे का निघत नाहीत, अशी विचारणा छगन भुजबळांनी केली आहे.
Maharashtra Politics: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार असताना राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच ST चे सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मोठा संप केला होता. अनेक महिने हा संप चालला. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी मोर्चा नेत आंदोलन केले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. शरद पवार यांना त्रास देण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आले होते. आता तुमचे सरकार आले आहे, एसटीचे विलिनीकरण करून दाखवा, असे आव्हान छगन भुजबळ यांनी शिंदे सरकारला दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित पक्षाच्या एका मेळाव्यात छगन भुजबळ बोलत होते. यावेळी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाणे, एसटी कर्मचाऱ्यांचे शरद पवारांच्या घरावर झालेले आंदोलन यांसह अन्य अनेक मुद्द्यांवरून छगन भुजबळ यांनी शिंदे-भाजप सरकारवर हल्लाबोल केला. एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरण झालेच पाहिजे, या मागणीसाठी शरद पवारांच्या घरावर आंदोलन केले. सुप्रिया सुळे रणरागिणी बनून आंदोलकांना सामोऱ्या गेल्या. शरद पवारांना त्रास देण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आले. तुमचे मोर्चे आता का निघत नाही, अशी विचारणा करत आता तुमचेच सरकार आले आहे. एसटीचे विलिनीकरण करून दाखवा, असे आव्हान छगन भुजबळ यांनी दिले.
गुजरातला फॉक्सकॉन आणि तुम्हाला पॉपकॉर्न
वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यावरूनही छगन भुजबळ यांनी सरकारवर टीका केली. वेदांता फॉक्सकॉनचा कोट्यवधींचा प्रकल्प गुजरातला गेला. तो गेला नाही, त्यांनी नेला. आमच्या मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांनी आम्हाला सांगितले की, तुम्हाला मोठा प्रकल्प देणार आहोत. म्हणजे त्यांनी फॉक्सकॉन नेला आणि आम्हाला पॉपकॉर्न दिला, या शब्दांत छगन भुजबळ यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच राजकारणाची लढाई मैदानात लढा. यांना काही बोलले की ईडीची काडी लागते, असे सांगत देशभरात होणाऱ्या ईडी कारवाईवरून छगन भुजबळ यांनी टीका केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"