'भुजबळांना भाजपची ऑफर?'; फडणवीस मौन असल्याचं सांगत जरांगेंचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 11:54 AM2023-11-23T11:54:31+5:302023-11-23T11:56:54+5:30
अहमदनगर : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सुरू झालेला संघर्ष आणखीनच टोकदार होण्याची शक्यता आहे. कारण मराठा आरक्षण आंदोलक मनोज ...
अहमदनगर : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सुरू झालेला संघर्ष आणखीनच टोकदार होण्याची शक्यता आहे. कारण मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. "छगन भुजबळ यांना भाजपमध्ये पलटी मारायची तर नाही ना? कारण त्यांनी याआधीही अनेकदा पलटी मारली आहे," असा हल्लाबोल जरांगे पाटलांनी केला आहे.
छगन भुजबळ यांच्याकडून मराठा आरक्षणाबाबत आक्रमक वक्तव्ये होत असतानाही त्यावर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन बाळगल्याचं सांगत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "छगन भुजबळ यांना भाजपकडून काहीतरी ऑफर आली असेल. कारण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे काहीच बोलत नाही आणि त्यांना थांबवतही नाहीत. मराठा समाजाला त्रास देण्यासाठी काही पलट्या मारण्याचे ठरलं आहे का, अशी आम्हाला शंका येत आहे. मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं करण्यासाठी सरकारने छगन भुजबळ यांना फूस लावली नाही ना?" अशी शंका जरांगे यांनी उपस्थित केली आहे.
येवल्यात पोस्टर्स फाडले, जरांगेंचा रोख कोणाकडे?
मनोज जरांगे पाटील यांची नुकतीच नाशिक येथे सभा पार पडली. या सभेच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाबाबत विविध ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर्स अज्ञात व्यक्तींकडून फाडण्यात आले होते. याबद्दल बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, "हा प्रकार झाला असला तरी मराठा समाजाने शांत राहिले पाहिजे. पोस्टर फाडल्याने काही होणार नाही. पण राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोण बिघडवत आहे, याकडे गृहमंत्री फडणवीसांनी बघितलं पाहिजे. फडणवीस यांच्या मनात काय आहे, हे एकदा त्यांनी सांगायला पाहिजे," असंही जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची आज अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे सभा होणार असून या सभेत त्यांच्या निशाण्यावर कोण असणार, हे पाहावं लागेल.