Maharashtra Politics: “उद्या मातोश्री अन् बाळासाहेबांची बसण्याची जागाही घेऊन जातील”; छगन भुजबळ यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 04:45 PM2023-02-21T16:45:46+5:302023-02-21T16:46:24+5:30
Maharashtra News: सामान्य जनता म्हणते की, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंची आहे, असे सांगत छगन भुजबळ यांनी शिंदे गटावर टीका केली.
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय येणे बाकी असताना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल देत ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले. यावर अद्यापही राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यातील विधिमंडळातील शिवसेनेचे पक्ष कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेतल्यावर आता संसदेतील शिवसेनेचे पक्ष कार्यालय शिंदे गटाला देण्यात आले आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आता हे थांबायला पाहिजे, असा सल्ला शिंदे गटाला दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी शिंदे गटावर टीका केली. उद्धव ठाकरे यांचे म्हणणे वेगळे आहे. भाजपचे म्हणणे वेगळे आहे. म्हणून भाजप शिवसेना संपवयाला निघाली आहे. काहींना ईडीची नोटीस होती. काही लोक तिकडे गेल्यानंतर ईडी कारवाई बंद झाली. स्क्रिप्ट तयार होती. त्यानुसार केले, असा आरोप भुजबळ यांनी केला. याची कल्पना उद्धव ठाकरे यांना नव्हती असे काही नाही. त्यांना कल्पना होती, असेही ते म्हणाले.
उद्या मातोश्री अन् बाळासाहेबांची बसण्याची जागाही घेऊन जातील
थोडाफार विश्वास न्यायालयावर आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर आहे. त्यांनी लवकरात लवकर हा संघर्ष संपवायला पाहिजे. रोज सुनावणी होतेय. दोन पक्ष झाले. पण आता सर्वच ते घेऊन जाताहेत. असा टोला शिंदे गटाला लावला. उद्या मातोश्री आणि बाळासाहेबांची बसण्याची जागाही घेऊन जातील. त्यावरही दावा सांगतील, हे आता थांबायला पाहिजे, इथंपर्यंत जाण्याची गरज नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आम्ही बाहेर पडलो. काहींनी नवीन पक्ष काढले. पण, असे काही झाले नाही. अजूनही सहानुभूती उद्धव ठाकरे यांना आहे. हे या लोकांच्या का लक्षात येत नाही. सामान्य मनुष्य सांगतो शिवसेना बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांची आहे. शिंदे गटाने थांबले पाहिजे. शाखा, कार्यालय आमचे हेच सुरू आहे. बांधला बांध असताना जशी मारामारी चालते तेच सुरू आहे. लोकांनी हेच बघायचे का, असा सवाल भुजबळ यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"