बाप दाखवा नाहीतर...; छगन भुजबळ समर्थक चिडले, रोहित पवारांना खडसावले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 04:39 PM2022-11-29T16:39:49+5:302022-11-29T16:40:18+5:30
छगन भुजबळ जे काही म्हणाले त्यात चुकीचं काय? जर चुकीचं असेल तर सिद्ध करा असं आव्हान भुजबळ समर्थकांनी रोहित पवारांना दिलं आहे.
पुणे - महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त पुण्यात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून आता राष्ट्रवादीतच गटबाजी झाल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी नेते आमदार रोहित पवार यांनी कुठलेही विधान करताना आपण काळजी घेतली पाहिजे असं म्हटलं. भुजबळांवर विचारलेल्या प्रश्नावर रोहित पवारांनी असं विधान केल्याने आता छगन भुजबळ समर्थक चिडल्याचं दिसून येत आहे.
पुण्यात भुजबळ समर्थकांनी रोहित पवारांचा निषेध केला. भुजबळ समर्थक सपना माळी शिवणकर म्हणाल्या की, छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहे. काल उगवलेला पोरगा अशा शब्दांमध्ये बोलत असाल ही भूमिका असेल आम्ही त्यांचा निषेध करणारच. आम्ही राष्ट्रवादी समर्थक नाही भुजबळांची समर्थक आहे. जेव्हा जेव्हा साहेबांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत असेल तेव्हा आम्ही शांत बसणार नाही. भुजबळसाहेबांबद्दल पुन्हा असं वक्तव्य करू नका असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत छगन भुजबळ जे काही म्हणाले त्यात चुकीचं काय? जर चुकीचं असेल तर सिद्ध करा. रोहित पवारांनी अभ्यास करावा. पुरोगामी म्हणून ते पक्षाची धुरा सांभाळणारे असतील तर त्यांनी अभ्यास करणे गरजेचे आहे. काळजीपूर्वक बोलावं म्हणजे कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकणारं आहे. रोहित पवारांनी पातळी ओळखावी. पुस्तक वाचावी. तुम्ही बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला. खोटे असेल तर सिद्ध करा. समतेचा विचार घेऊन भुजबळ पुढे चालले. ते पक्षाच्या कार्यक्रमात बोलले नव्हते. फुलेंचा विचार पुढे मांडत असतील तर त्यांना विरोध करण्याचं कारण काय? असा सवाल भुजबळ समर्थक सपना माळी शिवणकर यांनी विचारला आहे.
काय म्हणाले होते रोहित पवार?
सरस्वतीनं किती शाळा बांधल्या, किती लोकांना शिकवलं? असं छगन भुजबळ एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी म्हटलं होतं की, कोणत्याही देवदेवतांचा अपमान होणार नाही. याची काळजी सर्वच घेतात. भुजबळसाहेबांनी केलेले विधान मी ऐकलेले नाही. ते कोणत्या उद्देशाने बोलले माहिती नाही. पण देव, देवता, थोर व्यक्ती, धार्मिक अध्यात्मिक याविरोधात कुणी बोलायला नको. बोलताना सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
भुजबळांनी दिला सल्ला
मी रोहित पवारांच्या विधानावर फार काही बोलणार नाही. केवळ त्यांनी अभ्यास करावा. कारण त्यांच्या घराण्याला सत्यशोधक विचारांचा मोठा वारसा लाभलेला आहे. त्यांचे आजोबा, पणजोबा सर्व सत्यशोधक विचारांच्या मुशीतून तयार झालेले आहेत. हळूहळू त्यांच्या लक्षात येईल असं सांगत छगन भुजबळांनी रोहित पवारांना सल्ला दिला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"