एसटी कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांचा हल्ला; शरद पवार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 06:56 AM2022-04-11T06:56:40+5:302022-04-11T06:57:05+5:30

देशात सत्ता आहे. मात्र, महाराष्ट्रात सत्ता नसल्याने विरोधक अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची सत्ता धोक्यात आणण्यासाठी दरदिवशी नवनवी षडयंत्रे रचली जात आहेत.

ncp chief Sharad Pawar allegation on bjp over st workers issue | एसटी कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांचा हल्ला; शरद पवार यांचा आरोप

एसटी कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांचा हल्ला; शरद पवार यांचा आरोप

Next

अमरावती :

देशात सत्ता आहे. मात्र, महाराष्ट्रात सत्ता नसल्याने विरोधक अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची सत्ता धोक्यात आणण्यासाठी दरदिवशी नवनवी षडयंत्रे रचली जात आहेत. ईडी, सीबीआय चौकशी हे खेळणे करून ठेवले आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर कसे होईल, याचे स्वप्न विरोधक बघत आहेत. एसटी कामगारांच्या आड घरावर झालेला हल्ला हे त्याचेच द्योतक आहे. एसटी कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांनीच तो हल्ला घडवून आणला, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी रविवारी येथे केला.

अमरावतीत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय संवाद बैठकीला संबोधित करताना ते म्हणाले, देशात बेरोजगारी, महागाई यासारखे अनेक बिकट प्रश्न असताना त्यावरून लक्ष वळविण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना अस्थिर करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न होत आहे. मी गत ४० ते ५० वर्षांपासून एसटी कामगारांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी आघाडीवर आहे. घरावर हल्ला करण्यामागे मी कामगारांना दोष देणार नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. सर्वसामान्य एसटी कामगारांना भडकावले. कारण नेतृत्व चुकीचे होते, असे ते म्हणाले. 

राजकारणात मी अनेक संकटे जवळून बघितली आहेत. मुंबईचा बॉम्बस्फोट असो वा किल्लारीचा भूकंप. मुंबईत दंगली झाल्या तेव्हा हिंदू व मुस्लीम भागातही जाऊन भेटी घेतल्या. शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला आणि सोमवारी मुंबई पुन्हा धावली. मात्र, अलीकडे सांप्रदायिक शक्तींकडून एका चित्रपटाच्या नावाने हिंदू समाजात अस्वस्थता पसरविण्याचे काम सुरू आहे, असे सांगून संविधानावर विश्वास असलेल्या विचारसरणींनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी मंचावर खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते आदी उपस्थित होते. दरम्यान, पवार यांनी अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. 

नागपूर विमानतळ झाले पोलीस छावणी
शरद पवार यांचे रविवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन व त्यानंतर तापलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. प्रचंड पोलीस बंदोबस्तात पवार अमरावतीच्या दिशेने रवाना झाले. पवार यांच्या स्वागतासाठी विमानतळावर पक्ष कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, अशी अपेक्षा होती; परंतु मोठे पदाधिकारी व निवडक कार्यकर्ते दिसून आले. सुरक्षेच्या दृष्टीने मर्यादित कार्यकर्त्यांची उपस्थिती असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

Web Title: ncp chief Sharad Pawar allegation on bjp over st workers issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.