आपल्या ताकदीमुळे दिल्लीचीही झोप उडाली असेल; कांदा प्रश्नावरून शरद पवारांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 01:28 PM2023-12-11T13:28:25+5:302023-12-11T13:42:37+5:30
सत्ताधाऱ्यांना जेव्हा कळलं की चांदवडमध्ये सर्व लोक एकत्र जमून आपली शक्ती दाखवणार आहेत, तेव्हाच सरकार दरबारी हालचाल सुरू झाल्याचंही शरद पवार म्हणाले.
नाशिक :केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे रस्त्यावरील लढाईसाठी मैदानात उतरले आहेत. कांदा निर्यातबंदी उठवण्यात यावी, या मागणीसाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना शरद पवार यांनी शेतकरी प्रश्नावरून केंद्र सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला. तसंच आपण ताकद दाखवल्यामुळे आता दिल्लीचीह झोप उडाली असेल, असं पवार यांनी म्हटलं.
रास्तारोको आंदोलनात कांदा प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, "देशाच्या अर्थव्यवस्थेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंद आहे. मात्र सरकारच्या धोरणामुळे तुमच्या कष्टाला किंमत नाही. कांद्याच्या निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्याचा संसार उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे कांदाच्या निर्यातीवरील बंदी उठवलीच पाहिजे. रास्तारोको आंदोलन करून लोकांना त्रास देण्याची आम्हाला काही हौस नाही. पण हे केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही. आज इथं आपण आलो, रस्त्यावर बसलो, माझी खात्री आहे की दिल्लीचीही झोप उडाली असेल. आज सकाळपासून मी टीव्हीवर बघत आहे की राज्यातील विविध नेते बोलत आहेत की आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करणार, हा निर्णय बदलणार, असं म्हणतायत. याआधी हा प्रश्न निर्माण झाल्यापासून कोणाला आठवण आली नाही. मात्र त्यांना जेव्हा कळलं की चांदवडमध्ये सर्व लोक एकत्र जमून आपली शक्ती दाखवणार आहेत, तेव्हाच सरकार दरबारी हालचाल सुरू झाली. तरीही एवढ्यावरच समाधान मानून आपल्याला चालणार नाही, लक्ष ठेवावं लागेल. कारण सध्याचे राज्यकर्ते शेतकऱ्यांसाठी योग्य धोरण आखणारे नाहीत," अशा शब्दांत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.
'कांदा महाग वाटत असेल तर खाऊ नका'
कांदा महाग झाल्याची ओरड करणाऱ्यांना टोला लगावताना शरद पवार यांनी म्हटलं आहे की, "कांदा महाग झाला आहे, अशी चर्चा आज सुरू आहे. कांदा खाणंही कठीण झालं आहे, असं म्हटलं जातं. कठीण झालंय तर खाऊ नका. शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळाले पाहिजेत. पण सरकारने लगेच निर्णय घेतला आणि निर्यातीवर कर लावला. आता तर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय लवकरात लवकर मागे घ्या," अशी मागणी यावेळी पवार यांनी केली.
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र नाहीच? भूमिकेचा पुनरुच्चार करत अजित पवार म्हणाले...
दरम्यान, "आज येताना मला काही शेतकऱ्यांनी निवेदन दिलं. त्यांनी सांगितलं की, २६ तारखेला आमच्याकडे गारपीट झाली. या गारपिटीमध्ये द्राक्षबागांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र सरकारकडून मदत देण्यात आलेली नाही," असंही यावेळी शरद पवार म्हणाले.