शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीस्वाराला धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 03:24 PM2019-11-14T15:24:50+5:302019-11-14T15:25:04+5:30
पवारांचा ताफा नागपूर जिल्ह्यातील भारसिंगी येथून खापाकडे जात असताना हा अपघात झाला.
मुंबई: राज्यात परतीच्या पावसामुळे मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात असताना शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. तर या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
पवारांचा ताफा नागपूर जिल्ह्यातील भारसिंगी येथून खापाकडे जात असताना हा अपघात झाला. शरद पवारांच्या गाड्यांचा ताफा जामगावजवळ आला असता या ताफ्यातील पोलीस वाहनाची एका मोटरसायकलला धडक लागली. यानंतर शरद पवारांच्याच ताफ्यातील गाडीने या जखमी बाईकस्वाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या बाईकस्वारावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
दुचाकीस्वाराला धडक देणारी पोलिसांची बोलेरो ही गाडी ताफ्यात शरद पवार यांच्या वाहनाच्या 4 ते 5 वाहन मागे चालत होती. अचानक ब्रेक लागल्यामुळे ही दुर्घटना झाली असे सांगितले जात आहे. तरुणावर जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.
राज्यातील बहुतांश भागात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच शेतकऱ्यांच्या शेताची, पिकांची पाहणी करण्यासाठी शरद पवार दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. तर याच दौऱ्यातून शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न पवार करत आहे.