समाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 06:31 PM2020-01-23T18:31:56+5:302020-01-23T18:37:47+5:30
'अल्पसंख्याक समाजाच्या समस्या सोडवायच्या आहेत.'
मुंबई : समाजात फूट पाडण्याचे काम, समाजातील एकजूट तोडण्याचे काम सध्याचे शासन करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. अल्पसंख्याक सेलची बैठक आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते.
केंद्र सरकारकडून अलीकडे जे काही निर्णय घेण्यात आले आहेत त्यातून समाजातील काही लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. समाजात फूट पाडण्याचे काम, समाजातील एकजूट तोडण्याचे काम सध्याचे शासन करत आहे. देशाच्या एकतेसाठी हे मोठे संकट आहे. अशा विचारधारेला कशाप्रकारे दूर लोटता येईल, याचा आपण सगळ्यांनीच विचार करण्याची आवश्यकता आहे, असे शरद पवार म्हणाले.
अल्पसंख्याक समाजाच्या समस्या सोडवायच्या आहेत. सध्या देशात भाजपाची सत्ता आहे. समाजातील सर्व वर्गाला सोबत घेऊन जायचे असतं ही सरकारच्या नेतृत्वाची जबाबदारी असते. भारतातील सर्व लोकांना अधिकार आहे परंतु त्यांच्या मनात शंका निर्माण केली जात आहे, असा आरोप शरद पवार यांनी भाजपावर केला.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार माजिद मेमन, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक आदींसह पक्षाचे इतर नेते उपस्थित होते.
या बैठकीत शरद पवार यांनी मांडलेले मुद्दे...
- केंद्र सरकारचे आज समाजातील पिछडलेल्या वर्गाकडे लक्ष नाही. या वर्गासाठी परिवर्तन करण्याचे काम आपण केले पाहिजे. ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे ते ठराविक समाजाचा विचार करून निर्णय घेण्याचे काम करत आहेत. बहुसंख्य लोकांना याची जाणीव नाही.
- क्रिकेट क्षेत्रात काम करत असताना मी पाकिस्तानमध्ये बैठकीला गेलो होतो. तेव्हा असे अनेक लोक मला भेटले की त्यांचा एकतरी नातेवाईक भारतात आहे. त्यांची मनापासून इच्छा आहे की, त्यांच्या नातेवाईकांसोबत भेटीगाठी व्हाव्यात. पण केवळ ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांना भारतात येण्यास परवानगी नाही.
- जनगणनेत प्रत्येकाच्या जन्माची नोंद करण्याचा निर्णय होत आहे. जन्म झालेल्या गावाची देखील नोंद होईल असे पाहण्यात येत आहे. पण जो भटका समाज आहे त्याच्या जन्माची कोणती नोंद असेल का? त्याला भारतीय नागरिकत्व मिळेल का? नाहीतर त्याच्यावर अन्याय होणार आहे.
- समाजातील अनेक गोष्टींचा परिणाम सामाजिक न्याय विभागात असलेल्या घटकांना बसतो. यासाठी आपण जागरूक राहावे लागेल. एक जबरदस्त संघटन उभारून ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्या पाठीशी उभे राहून, त्यांना न्याय मिळवून देण्याची व्यवस्था आपण करायला हवी.
- आज तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली आहे. आपल्या पक्षाने लहान घटकांना न्याय मिळण्यासाठी सामाजिक न्याय व अल्पसंख्याक विभागाची जबाबदरी स्वतःकडे घेतली आहे. राज्यातील सर्व लहान घटकांना शिक्षण, सुविधा, महिला सुरक्षा अशा सर्व गोष्टीत बळकटी मिळण्याचा प्रयत्न यातून होईल.
- राज्यात तीन पक्षाची सत्ता आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे तीन भाग होतात. यातील आपल्याला मिळालेल्या एका भागाचे आपण चार भाग करत आहोत. एक सामाजिक न्याय विभागात काम करण्यासाठी, दुसरा अल्पभूधारकांसाठी, तिसरा महिलांच्यासाठी, तर चौथा संघटनाचे काम करणाऱ्या इतर लोकांसाठी...
- मागास वर्गियांसाठी अधिकारांचा योग्य वापर कसा करायचा याची नीती आपण ठरवू. यासाठी तुमच्या सर्वांची साथ मिळण्याची गरज आहे. राज्यातील सर्व समाज घटकांना योग्य न्याय कसा मिळेल याची जबाबदारी राज्य सरकारची असेल व ती चोखपणे पार पाडण्यात येईल.