तुम्ही हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?; शरद पवारांनीच सांगितला आपला 'रोल'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 09:58 AM2020-07-11T09:58:13+5:302020-07-11T09:58:19+5:30
Sharad Pawar Sanjay Raut Interview: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणणाऱ्या पवारांचं रोखठोक उत्तर
मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शंभरपेक्षा जास्त आमदार निवडून आलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर राखण्याची किमया शरद पवार यांनी करून दाखवली. त्यामुळे पवार महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार ठरले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकदा शरद पवारांच्या भेटीगाठी घेत असतात. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये पवार यांची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. आता दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच ठाकरे सरकारमधील त्यांचा 'रोल' स्पष्ट केला आहे. (Sharad Pawar Sanjay Raut Interview)
ठाकरे सरकारचे हेडमास्तर, रिमोट कंट्रोल अशा शब्दांमध्ये शरद पवार यांचं वर्णन केलं जातं. त्यावर शरद पवार यांनी भाष्य केलं. 'मी राज्यातील सरकारचा हेडमास्तर असण्याचं काही कारण नाही. त्यासाठी आधी सरकारमध्ये असलं पाहिजे. मी सरकारमध्येच नसल्यानं तशी शक्यता नाही. रिमोट कंट्रोलचं म्हणाल तर सरकार किंवा प्रशासन हे कधी रिमोट कंट्रोलनं चालत नाही. लोकशाहीमध्ये तर नाहीच नाही,' असं ते ठामपणे म्हणाले.
आपल्या देशात लोकशाही असल्याचं शरद पवार पुढे म्हणाले. रिमोट कंट्रोलबद्दल बोलताना त्यांनी रशियात घडलेल्या घडामोडींचा संदर्भ दिला. 'रशियात पुतीन हे २०३६ पर्यंत अध्यक्ष राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. लोकशाही वगैरे त्यांनी बाजूलाच सारली आहे. अशा ठिकाणी रिमोटचा वापर होतो. आपलं सरकार हे लोकशाही सरकार आहे. इथे रिमोट चालत नाही,' असं पवार यांनी म्हटलं.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनवरून मुख्यमंत्र्यांसोबत मतभेद आहेत का, या प्रश्नालादेखील शरद पवारांनी उत्तर दिलं. लॉकडाऊनचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला. प्रसारमाध्यमंदेखील त्याला अपवाद नाहीत. त्याचे परिणाम वृत्तपत्रांवर झाले. राजकीय नेत्यांचे कार्यक्रम कमी झाल्यानं नाराजीच्या बातम्या आल्या. मात्र आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचं शरद पवार म्हणाले. सुरुवातीच्या काळात कठोर लॉकडाऊन गरजेचा होता, अशी माझी भूमिका होती. मुख्यमंत्र्यांनी राज्यात कठोर लॉकडाऊन केला. तशी भूमिका घेतली नसती, तर मुंबईची अवस्था न्यूयॉर्कसारखी झाली असती. मृतांची संख्या प्रचंड वाढली असती, असं शरद पवार यांनी सांगितलं.
कोरोनाबरोबर जगायची तयारी असावी; तो दैनंदिन जीवनाचाच एक भाग- शरद पवार
लॉकडाऊनवरून उद्धव ठाकरेंशी मतभेद?; शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत
"...म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आली" - शरद पवार