Sharad Pawar: “सातारच्या ‘त्या’ पावसातील सभेचे श्रेय माझ्याकडे नाही”; शरद पवारांनी सांगितली Inside Story
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 07:09 PM2023-03-04T19:09:27+5:302023-03-04T19:10:09+5:30
शरद पवारांची भर पावसातील सभा चांगलीच गाजली. याची एक आठवण सांगत त्यावेळी नेमके काय घडले, ते सांगितले.
Sharad Pawar: मला शाळेचा अभ्यासाचा कंटाळा यायचा. शाळा संपली की बाहेर वेळ घालवायचो. शाळेत शिकत असताना माझ्या आईला वाटत होते की मी शिकत नाही, म्हणून माझ्या भावाकडे मला राहायला पाठवले. त्यानंतर प्रवरानगरला शाळेत प्रवेश घेतला.त्यावेळी पोर्तुगीज मुक्त गोवा, अशी मागणी केली जात होती. काही लोक महाराष्ट्रातून तिकडे गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार केला.काहीजण मृत्युमुखी पडले, त्यानंतर महाराष्ट्र पेटून उठला. आम्ही ज्या शाळेत शिकत होतो, ती शाळा आम्ही बंद पडली. माझ्या राजकारणाची सुरुवात तिथून झाली आणि आज मी अजून राजकारणात आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
बारामती येथील गदिमा सभागृहात विद्या प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित तारांगण युवा महोत्सव अंतर्गत विद्यार्थ्यांनी पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी शरद पवार यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. राज्यात कुठेही गेले तरी लोक आस्थेने बोलतात, लोकांच्या जीवनात आणि राहणीमान बदल झाले की समाधान मिळते. पूर्वी पितळीत चहा मिळायचा. परत चहा कपात आणायचे, पण कपाचे कान तुटलेला असायचा. आज त्याच घरातील सूनेकडून ट्रे मधून चहा येतो, हे बघितल्यावर समाधान मिळते, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.
सातारच्या ‘त्या’ पावसातील सभेचे श्रेय माझ्याकडे नाही
शरद पवार यांनी भर पावसात घेतलेली सभा चांगलीच गाजली होती. यानंतर राज्यातील राजकीय चक्रे फिरल्याचे बोलले जाते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणूक प्रचारासाठी साताऱ्यात ही सभा झाली होती. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, साताऱ्याच्या सभेचे श्रेय माझ्याकडे नाही. मी बोलायला उभा राहिलो आणि पाऊस आला. मला वाटले आता सभा संपली. पण लोकांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या. तेव्हा माझ्या लक्षात आले की लोकांना ऐकायचे आहे. मग मी बोलत राहिलो. लोकांनी ऐकले. अन् आमचा उमेदवारही निवडून दिला. त्या सभेचा व्हिडिओ सर्वत्र फिरले. राज्यभरातून त्याचे कौतुक झाले. ती सभा ऐतिहासिक ठरली होती, असे शरद पवार यांनी नमूद केले.
दरम्यान, क्रिकेट माझे क्षेत्र नव्हते. माझे सासरे क्रिकेटर होते. माझ्या लग्नाला क्रिकेटर हजर होते. त्यानंतर क्रिकेटशी जवळीक निर्माण झाली. गरवारे क्लबचे भांडण होते. ते मिटत नव्हते. म्हणून त्या संघटनेच्या निवडणुकीला मी उभा राहिलो आणि निवडून आलो. मी कधी क्रिकेटमध्ये राजकारण येऊ दिले नाही. ज्या दिवशी भारत देश क्रिकेटमध्ये अव्वल झाला, त्यावेळी मी राजीनामा दिल्याचे पवार यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"