“माझ्या ‘त्या’ विधानाचा विपर्यास केला, चुकीचा अर्थ काढला”; शरद पवारांचा युटर्न?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 05:17 PM2023-04-24T17:17:09+5:302023-04-24T17:18:13+5:30
Sharad Pawar News: २०२४ मधील निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार की नाही हे आताच कसे सांगणार, असे विधान शरद पवार यांनी केले होते.
Sharad Pawar News: अगदी वर्षभरावर आलेली लोकसभेची निवडणूक आणि दीड वर्षावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाविरोधात राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाची महाविकास आघाडी वज्रमुठ सभांच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करत आहे. मात्र, यातच महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे काही उदाहरणांतून दिसून येते, असे म्हटले जाते. मात्र, यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, आता माझ्या विधानाचा विपर्यास केला, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, २०२४ मधील निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार की नाही हे आताच कसे सांगणार, एकत्र लढण्याची इच्छा आहे. मात्र केवळ इच्छा पुरेशी नसते, त्यामुळे एकत्र लढणार की नाही हे आताच सांगता येणार नाही, असे शरद पवार म्हणाले. एकीकडे संजय राऊत हे २०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रच लढणार, असे संजय राऊत हे वारंवार सांगत आहेत. उद्धव ठाकरे हेही एकत्र लढण्यास उत्सुक आहेत. मात्र शरद पवार यांनी केलेल्या या विधानामुळे एकत्र लढण्याबाबत महाविकास आघाडीमध्ये संभ्रम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्या ‘त्या’ विधानाचा विपर्यास केला, चुकीचा अर्थ काढला
माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला आहे. महाविकास आघाडीत जागा वाटप निश्चित नाही. महाविकास आघाडी टिकून राहावी, हाच माझा प्रयत्न आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास नको, असे शरद पवार यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार यांनी आधी केलेल्या विधानानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.
दरम्यान, कोणाला काय वाटते आणि कोणाच्या मनात काय आहे, हा आमचा प्रश्न नाही, आम्ही काही पक्षांना बरोबर घेऊन लढत आहोत. राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. लोकशाही, संविधान संपुष्टात आणण्याचे काम सुरु आहे. भाजपाच्या या मनमानी कारभाराविरोधात एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट असून या लढ्यासाठी जे पक्ष बरोबर येतील त्यांना एकत्र घेऊन लढा दिला जाईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"