Sharad Pawar on Sambhaji Raje Chhatrapati: महाविकास आघाडी संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवणार? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 01:08 PM2022-05-10T13:08:43+5:302022-05-10T13:10:10+5:30
Sharad Pawar on Sambhaji Raje Chhatrapati: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी पक्षात दोन गट असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
कोल्हापूर: अलीकडील काळात अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपुष्टात आला आहे. यानंतर संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीतून ऑफर देण्यात आली आहे का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी संभाजीराजेंचे कौतुक करत, यासंदर्भात सूचक विधान केले आहे.
संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ नुकताच असून, हा कार्यकाळ संपताच आगामी राजकीय वाटचालीबाबत लवकरच घोषणा करणार आहे, अशी माहिती संभाजीराजेंनी दिली होती. शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अनेक मुद्द्यांवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांना संभाजीराजेंना महाविकास आघाडीच्या ऑफरबाबत विचारण्यात आले.
काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल
संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवण्याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र मी स्वत: राज्यसभेचा सदस्य आहे. राज्यसभेत महाराष्ट्राचे काही प्रश्न आले तर आम्ही स्वत:चा पक्ष बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन करत होतो. तेव्हा आम्हाला संभाजीराजेंचे नेहमीच सहकार्य लाभले आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच संभाजीराजेंना पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे शरद पवार म्हणाले. तसेच यावेळी शरद पवार यांनी संभाजीराजेंबाबत कौतुकोद्गार काढले.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना, या निवडणुका कशा पद्धतीने लढवायच्या, याबाबत अद्याप महाविकास आघाडीतील इतर पक्षांसोबत आमची चर्चा झालेली नाही. मात्र पक्षांतर्गत आम्ही याबाबत बैठक घेतली. या बैठकीत वेगवेगळे मतप्रवाह समोर आले आहेत. सर्वांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी आणि निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र बसावे, असे काही लोकांचे म्हणणे आहे, तर काही लोकांनी मागणी केली आहे की सरकारमध्ये आपण एकत्र असल्याने ही निवडणूकही महाविकास आघाडी म्हणूनच लढवावी, असे शरद पवार यांनी सांगितले.