“केजरीवालांवरील असंवैधानिक कारवाईविरोधात ‘इंडिया आघाडी’ एकजुटीने उभी”: शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 09:39 AM2024-03-22T09:39:20+5:302024-03-22T09:39:30+5:30
Sharad Pawar Reaction On Arvind Kejriwal Arrest: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून विरोधकांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे.
Sharad Pawar Reaction On Arvind Kejriwal Arrest: शंभर कोटी रुपयांच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत भाजपा आणि केंद्र सरकावर टीकास्त्र सोडले. इंडिया आघाडीसह विरोधकांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईचा कडक शब्दांतून निषेध नोंदवला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही भाजपावर हल्लाबोल केला.
शरद पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईविरोधात संताप व्यक्त केला. तसेच इंडिया आघाडी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत उभी असल्याची ग्वाही दिली. सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असताना विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, याचा तीव्र निषेध आहे. भाजपा सत्तेसाठी किती खाली झुकणार हे या अटकेवरून दिसून येत आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावरील या असंवैधानिक कारवाईविरोधात ‘इंडिया आघाडी’ एकजुटीने उभी आहे, या शब्दांत शरद पवार यांनी टीका केली.
मुख्यमंत्र्यांना अटक करणे खूप साधी गोष्ट झाली आहे
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही अरविंद केजरीवाल यांच्या अटकेप्रकरणी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. एक घाबरलेला हुकूमशाह, एक मृत लोकशाही बनवण्याचा प्रयत्न करत आहे. मीडिया सर्व संस्था काबीज करणे, पक्ष फोडणे, कंपन्यांकडून हप्तेवसुली करणे, प्रमुख विरोधी पक्षाची बँक खाती गोठवणे हे त्या ‘असुरी शक्ती’साठी कमी होते, यातच आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणे त्यांच्यासाठी खूप साधी गोष्ट झाली आहे, या शब्दांत राहुल गांधी यांनी निशाणा साधला.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना अटक झाली, तरी ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही. ते तुरुंगातून सरकार चालवतील, अशी चर्चा सुरु होती. विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी याला दुजोरा दिला. मात्र, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केल्यानंतर त्यांना राजीनामा दिला होता.