I.N.D.I.A. आघाडीत जागावाटपावरुन मतभेद? शरद पवार स्पष्टच बोलले, म्हणाले, “वाद होणार...”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 04:57 PM2023-09-29T16:57:17+5:302023-09-29T16:59:29+5:30
Sharad Pawar On I.N.D.I.A. Alliance: विरोधकांच्या इंडिया आघाडीत लोकसभेच्या जागावाटपावरून मतभेद असल्याबाबत चर्चा सुरू असून, शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.
Sharad Pawar On I.N.D.I.A. Alliance: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून आता उमेदवार कोण असतील, याबाबत चाचपणी सुरू आहे. विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केली असून, जागावाटपाबाबत निश्चितता आलेली पाहायला मिळत नाही. यातच पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल, याबाबतही एकमत होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी इंडिया आघाडीत जागावाटपावरून मतभेद आहेत का, याबाबत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
मीडियाशी बोलताना शरद पवार यांना लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद असल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर सध्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
जागांबाबत मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणुका येतील तेव्हा काही जागांबाबत मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे प्रश्न येतात, तेव्हा त्या राज्यात ज्यांचा रस नाही, अशांना तिथे पाठवून त्या मतभेदांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. मध्य प्रदेश, राजस्थान यासह चार राज्यांमधल्या निवडणुका सध्या महत्त्वाच्या आहेत. तिथे एकवाक्यता करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अद्याप ती प्रक्रिया आम्ही सुरू केलेली नाही. मुंबईत परतल्यानंतर काँग्रेस व इतर पक्षीय नेत्यांशी चर्चा करून यावर वाद होऊ नये याची काळजी आम्ही घेऊ. हे येत्या ८-१० दिवसांत होईल असा अंदाज आहे, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
दरम्यान, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण अशा विविध समुदायांकडून आरक्षणाच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली जाताना पाहायला मिळत आहे. यावर बोलताना, लोकांची आरक्षणाची मागणी आहे. त्यासाठी उपोषण केले गेले. राज्य सरकारने त्यांना मुदत वाढवून दिली आहे. प्रश्न सोडवण्याचा विश्वास दिला आहे. ज्यांना आरक्षण मिळते, त्यांच्यातला वाटा अन्य कुणी घेऊ नये अशी अपेक्षा ओबीसींची आहे. त्याची नोंद सरकारला घ्यावी लागेल. दुसऱ्या कोट्यातून आरक्षण दिले जाणार नाही या मुद्द्यावर निर्णय घेण्याचा विश्वासही शिंदे सरकारने दिला आहे. आता राज्य सरकार नेमका काय निर्णय घेते, हे पुढच्या ३०-३५ दिवसांत दिसेल. त्यानंतर मार्ग निघाला तर आनंदाची गोष्ट आहे. नाहीतर काय होईल हे सांगता येत नाही, असे शरद पवार म्हणाले.