राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा; शरद पवारांची तीन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 10:07 AM2023-07-07T10:07:06+5:302023-07-07T10:08:11+5:30
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्रित यावे यासाठी मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत.
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत अजित पवार सत्तेत सहभागी झाले. यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. शरद पवार यांनी मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी बैठका घेतल्या. यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, असा सूर राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. यावर शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या. राज्यामध्ये नवीन राजकीय समीकरणे निर्माण झाली. राज्यात चालू असणाऱ्या राजकीय घडामोडींना स्थिरता मिळावी, यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्रित यावे, अशी मागणी कार्यकर्ते करू लागले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर एका शरद पवार यांनी तीन शब्दांत प्रतिक्रिया दिली.
नेमके काय म्हणाले शरद पवार?
अजित पवारांच्या मोठ्या निर्णयानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे अशा चर्चा सुरू आहेत. याबाबत राज्यात होर्डिंगही लागले आहेत, शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना, चांगली गोष्ट आहे, असे म्हटले आहे. तसेच मला पूर्ण विश्वास आहे, २०२४ मध्ये महाराष्ट्रातील सत्ता बदलेल. जे सत्तेत आहेत त्यांना लोक सत्तेपासून दूर करतील. राज्यातील विरोधी पक्षांविरोधात ज्या प्रकारच्या गोष्टी केल्या त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. मी अजूनही सक्रीय आहे. मग ८२ काय आणि ९२ काय मला फरक पडत नाही, असे शरद पवार यांनी नमूद केले.
दरम्यान, या दोन्ही भावांनी एकत्रित यावे यासाठी मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत. विशेष म्हणजे मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे विश्वासू अभिजीत पानसे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडे युतीचा प्रस्ताव घेऊन गेल्याचा दावा केला जात असून, याची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.