Maharashtra Politics: मोहन भागवतांच्या ‘त्या’ मताशी शरद पवार सहमत; म्हणाले, “हा बदल योग्य अन् समाधानकारक, पण...”
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 01:02 PM2022-10-08T13:02:32+5:302022-10-08T13:03:25+5:30
Maharashtra News: भेदभावाला कारणीभूत सर्व गोष्टी लॉक केल्या पाहिजेत. वर्ण आणि जात संकल्पना मोडीत काढल्या पाहिजेत, असे मोहन भागवत म्हणाले होते.
Maharashtra Politics: राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीचे नेते शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. तर, दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केलेल्या काही विधानांवरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मोहन भागवत यांच्या मताला सहमती दर्शवल्याचे सांगितले जात आहे.
भेदभावाला कारणीभूत असलेल्या सर्व गोष्टी लॉक केल्या पाहिजेत. वर्ण आणि जात या संकल्पना मोडीत काढल्या पाहिजेत. वर्ण आणि जातिव्यवस्थेत मुळात भेदभाव नव्हता आणि त्याचे उपयोग होते. आज जर कोणी या संस्थांबद्दल विचारले तर त्याचे उत्तर हेच असेल की, तो भूतकाळ झाला आहे, चला विसरूया. जगभरातील सर्वच समाजात पूर्वजांनी चुका केल्या आहेत. याचा अर्थ ते सारेच कुटिल होते असे नाही. आपल्या देशातही हेच झाले. आपल्यातील दरी वाढत गेली. दुर्दैवाने हे पाप आपल्याकडून घडले. त्यामुळे आता याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही, असे प्रतिपादन मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले. यावर शरद पवारांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हा बदल योग्य अन् समाधानकारक, पण...
मोहन भागवतांचे वक्तव्य माझ्या वाचनात आले आहे. ही गोष्ट समाधानाची आहे. समाजातील एका मोठ्या वर्गाच्या काही पिढ्यांना यातना सहन कराव्या लागल्या. या यातनांची जाणीव त्या घटकाला होत असून, हा योग्य बदल आहे. पण, नुसते माफी मागून चालणार नाही. आपण व्यवहारामध्ये या सर्व वर्गाबाबत भूमिका कशी घेतो, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, महाभारत, रामायण, उपनिषदे आदी भारतीय शास्त्रांमध्ये अतिशय तटस्थतेने प्रत्येक विचार प्रस्थापित करण्यात आला आहे. त्यात नायक आणि खलनायकाचे विचारही तटस्थ विचार प्रक्षेपित झाले आहेत. परंतु, खलनायकाच्या विचारांवर जोर देऊन इंग्रज व अन्य फुटीरतावाद्यांनी लोकांची माथी भडकावली आणि हेच भारतीय विचार असल्याचे बिंबविले आणि त्यात साराच समाज भ्रमिष्ट झाल्याने वाणीविवेक व कृतिविवेकाने पुढे जाणे गरजेचे असल्याचे डॉ. मोहन भागवत यावेळी म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"