Maharashtra Politics: प्रकाश आंबेडकरांचा समावेश महाविकास आघाडीत होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 10:54 AM2023-01-28T10:54:38+5:302023-01-28T10:55:38+5:30
Sharad Pawar Live: ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत शरद पवार यांनी सविस्तर आणि स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
Sharad Pawar Live: हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर करण्यात आली. यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत समावेश होणार का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेना ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.
शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. तुमच्यावरून ठाकरे गट आणि आंबेडकर यांच्यात वाद असल्याचे चित्र आहे, यासंदर्भात शरद पवार यांना विचारणा करण्यात आली. पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, त्या दोघात वाद आहे की नाही, हे मला माहिती नाही. ठाकरे गट आणि वंचित यांच्या चर्चेत आम्ही कुठे नव्हतो. आमच्या ज्या चर्चा झाल्या त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या सर्वांनी एकत्र निवडणुकीला सामोरे जावं अशी आमची मानसिकता आहे. तो प्रयत्न आम्ही सुरू ठेवणार आहोत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीने एकत्र जाण्याची स्पष्टता आहे
जागा वाटपाची वेळ आलेली नाही. त्याला अजून अवकाश आहे. आमची आंबेडकरांशी चर्चा झालेली नाही. जिथे चर्चा नाही, तिथे हरकतीचा प्रश्न येतोच कुठे?, असा प्रश्न करत, ज्या आघाडीच्या संबंधीचा प्रस्ताव आमच्याकडे आला नाही. त्यामुळे त्यांना स्वीकारायचे की नाही हा प्रश्न येतच नाही. महाविकास आघाडीने एकत्र जाण्याची स्पष्टता आहे. या पुढचे निर्णय कसे घ्यायचे याचा संवाद सुरू आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. यावेळी शरद पवार यांनी वंचितचा उल्लेख केला नाही. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तशी चर्चा आहे. त्यावर आपले काय मत आहे? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर, लोकसभा आणि विधानसभा एकत्र होतील असं काही लोकांचे मत आहे. पण त्याची विश्वासार्ह माहिती माझ्याकडे नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"