Sharad Pawar: “ठाकरे सरकारवर खापर फोडणे अयोग्य, शिंदे आणि सामंत दोघेही मंत्रिमंडळात होते”; पवारांनी सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 05:20 PM2022-09-15T17:20:12+5:302022-09-15T17:20:49+5:30
फॉक्सकॉनसारखा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जातो हे खरेच दुर्दैवी आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
Sharad Pawar: महाराष्ट्रात येणारा वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार घणाघात करत असून, शिंदे गट आणि भाजपकडून पलटवार करण्यात येत आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी उडी घेतली असून, शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले आहे. ठाकरे सरकारवर खापर फोडणे अयोग्य आहे. कारण शिंदे आणि सामंत दोघेही मंत्रिमंडळात होते, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना, फॉक्सकॉन प्रकल्प गेल्यामुळे त्यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ हे बोलणे म्हणजे रडणाऱ्या लहान मुलाला मोठा फुगा दाखवण्यासारखे असल्याचे म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र नेहमीच प्रथम क्रमांकावर होता. पण फॉक्सकॉनसारखा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जातो हे खरेच दुर्दैवी आहे, असे पवार म्हणाले.
शिंदे आणि सामंत दोघेही मंत्रिमंडळात होते
हा प्रकल्प तळेगावला येणार होता. त्याची चर्चा झाली होती. राज्य सरकारने आवश्यक त्या निर्णयाची तयारी केली होती. पण नंतर यात बदल झाला. त्यात आता काही पर्याय मला दिसत नाही. काही लोकांनी सांगितले की हा निर्णय बदलावा, महाराष्ट्रात आणावा. हे काही होणार नाही. असे व्हायला नको होते. महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जायला नको होता. पण तो गेला. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. याशिवाय ठाकरे सरकारवर याचे खापर फोडणे अयोग्य आहे. कारण, एकनाथ शिंदे आणि उदय सामंत तत्कालीन मंत्रिमंडळात होते. मंत्री होते, असे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकारचा कारभार अजून मला दिसलेलाच नाही. कारभार पाहता सगळी यंत्रणा थंड झाल्या आहेत का असा प्रश्न मनात येतो. आताही फक्त काय झाडी, काय डोंगर हेच ऐकायला मिळत आहे. महाराष्ट्रावर राज्यकर्त्यांचे लक्ष आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे, अशी शंका शरद पवारांनी उपस्थित केली.