शरद पवारांचे दिलीप वळसे पाटलांना प्रत्युत्तर, म्हणाले, “स्वबळावर मुख्यमंत्री झालो, तीनदा...”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 11:16 AM2023-08-26T11:16:41+5:302023-08-26T11:19:06+5:30
Sharad Pawar News: यापूर्वीचा राज्याचा इतिहास कुणाला माहिती नसेल तर त्यावर काय भाष्य करायचे, असा उलटप्रश्न शरद पवारांनी केला.
Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यावर अनेक प्रतिक्रियाही उमटल्या. शरद पवारांची कोल्हापूर येथे मोठी सभा झाली. यानंतर, काही दिवसांपूर्वी दिलीप वळसे-पाटील यांनी केलेल्या एका विधानाचा शरद पवार यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.
दिलीप वळसे-पाटील हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे व विश्वासू मानले जात होते. मात्र, अजित पवार गटासोबत जाताना त्यांनी शरद पवारांची उघडपणे साथ सोडल्याचे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यासंदर्भात मोठे विधान केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी त्या विधानावरून घुमजावही केले. यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यासंदर्भात बोलताना शरद पवारांनी थेट दिलीप वळसे-पाटील यांनाच लक्ष्य केले.
तीनदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो
मी स्वबळावर मुख्यमंत्री झालो. तीनदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. आधी पुलोद स्थापन करून मुख्यमंत्री झालो. दुसऱ्या वेळा काँग्रेससह माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या. ती आम्ही जिंकली. बहुमत आले. मी मुख्यमंत्री झालो. त्यामुळे यापूर्वीचा राज्याचा इतिहास कुणाला माहिती नसेल तर त्यावर काय भाष्य करायचे, असा उलटप्रश्न शरद पवार यांनी केला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
दरम्यान, शरद पवार यांच्या एकट्याच्या बळावर महाराष्ट्रातल्या जनतेने एकदाही राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत दिले नाही. शरद पवार पूर्ण बहुमतावर एकदाही मुख्यमंत्री झाले नाहीत. शरद पवार हे उत्तुंग नेते असतानाही राष्ट्रवादीने ठराविक संख्येच्या पुढे मजल मारलेली नाही. पक्षाचे ६० ते ७० आमदार निवडून येतात कुणाशीही तरी आघाडी करावी लागते, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले होते.