“कुणा गल्लीबोळातल्या लोकांवर प्रतिक्रिया मागाल...”; शरद पवारांचा बच्चू कडूंवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 12:48 PM2023-08-26T12:48:34+5:302023-08-26T12:49:15+5:30
बच्चू कडू कोण बाबा? मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे, असे सांगत शरद पवारांनी खोचक शब्दांत पलटवार केला
Sharad Pawar Replied Bacchu Kadu: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यावर अनेक प्रतिक्रियाही उमटल्या. यामध्ये प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना शरद पवार यांच्यावर टीका केली होती. याला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले.
शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत. ते जे बोलतात, तसे त्यांनी कधीच केलेले दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत्ताच्या खेळीनुसार पाहिले तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे किंवा कार्यकर्त्यांचे डोके फुटू नये एवढेच मी सांगेन. हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे की, काका-पुतणे संपूर्ण महाराष्ट्राला खुळ्यात काढत आहेत, अशा खोचक शब्दांत बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. मीडियाशी बोलताना शरद पवार यांना बच्चू कडू यांनी केलेल्या टीकेबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा शरद पवारांनी पलटवार केला.
कुणा गल्लीबोळातल्या लोकांवर प्रतिक्रिया मागाल...
कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांना बच्चू कडूंच्या या वक्तव्यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली. शरद पवार यांनी बच्चू कडूंना अप्रत्यक्षपणे चांगलेच सुनावले. बच्चू कडू कोण बाबा? मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. चार वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. केंद्रात महत्त्वाची जबाबदारी होती. त्यामुळे तुम्ही उद्या तर आणखीन कुणा गल्लीबोळातल्या लोकांबाबतच्या प्रतिक्रिया मला मागाल, या शब्दांत शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले. पत्रकारांनी बच्चू कडू चार वेळा आमदार असल्याची आठवण करून देताच शरद पवारांनी, ते चार वेळा आमदार आहेत. मी चार वेळा मुख्यमंत्री होतो, असा टोला लगावला.
दरम्यान, अजित पवार पक्षाचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही, असे विधान सुप्रिया सुळे यांनी केले होते. यानंतर शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना, यात कोणताही वाद नसल्याचे म्हटले. मात्र, नंतर अजित पवार पक्षाचे नेते असल्याचे आपण म्हटलोच नसल्याचा घुमजाव शरद पवारांनी केला. या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून उलटसुलट तर्क-वितर्कांना उधाण आले होते.