“निवडणूक लढणार नाही हे आता ठरवलेय, पण यापुढे...”; शरद पवारांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 03:20 PM2024-01-09T15:20:55+5:302024-01-09T15:23:56+5:30
Sharad Pawar News: अयोध्येला रामदर्शनाला जाणार का? या प्रश्नावर शरद पवार यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले.
Sharad Pawar News: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची इंडिया आघाडी जोरदार प्रयत्न करत आहे. जागावाटपावरून इंडिया आघाडीचे एकमत होताना दिसत नाही. राज्यातही महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून धुसपूस असल्याची चर्चा आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करत टीका केली जात आहे. यासंदर्भात बोलताना शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. आता निवडणूक लढणार नाही, हे मी आता ठरवले आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. आमदार अपात्रता प्रकरण, बिलकिस बानो प्रकरण, आगामी लोकसभा निवडणुका, महाविकाससह इंडिया आघाडीची रणनीति अशा अनेकविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांच्याकडून शरद पवारांच्या वयाचा उल्लेख वारंवार केला जातो. त्यावरून टीकाही केली जाते. तुम्ही आता आशिर्वाद द्या. मार्गदर्शन करा. साथ द्या, अशी साद अजित पवार गटातील नेते शरद पवार यांना घालतात. याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
निवडणूक लढणार नाही हे आता ठरवले आहे
खासदारकीची सध्याची टर्म संपल्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही. माझी खासदारकी अडीच वर्षांनंतर संपत आहे. त्यानंतर निवडणूक लढणार नाही हे ठरवले आहे. माझी खासदारकीची टर्म शिल्लक आहे. त्यामुळे तोपर्यंत काम करत राहणार आहे. मला लोकांनी तिथे पाठवले आहे. तिथे काम करु नको का? १९६७ पासून राजकारणात आहे . माझ्या विरोधकांनीही कधी वयावरून टीका केली नाही. अनेक संस्थांचा आजीवन अध्यक्ष आहे . तिथे मी काम करत राहणार आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराचा भव्य सोहळा आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, राम श्रद्धेचा विषय आहे. पक्षांकडून रामाबाबत कोणतेही विधान करण्यात आलेले नाही. जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य पक्षाचे विधान नाही. मुंबईचे पालकमंत्री शाळांमध्ये रामाबाबत स्पर्धा घेण्यासाठी सक्ती करत आहेत हे योग्य नाही. हा सेक्युलर देश आहे . गर्दीत रामाच्या दर्शनाला जाणार नाही. राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर जाईन, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.