Maharashtra Political Crisis: “अनेक शिवसैनिक भेटायला यायचे, आमदार सोडून गेले तरी...”; शरद पवारांची उद्धव ठाकरेंना साद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 05:13 PM2022-07-13T17:13:23+5:302022-07-13T17:14:03+5:30
Maharashtra Political Crisis: एकीकडे शिंदे गट राष्ट्रवादीवर टीका करत असताना, दुसरीकडे शरद पवारांनी पुढील निवडणुका शिवसेनेसोबत लढण्याबाबत सूतोवाच केले आहे.
मुंबई: राज्यात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आता 'मिशन मुंबई मनपा'साठी कामाला लागले आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुंबईत राष्ट्रवादीच्या मुंबई विभागीय नेत्यांची बैठक घेतली. यावेळी शरद पवार यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुन्हा एकदा साद घातली आहे. पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि आपली शक्ती एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
या बैठकीला राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार म्हणाले की, दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर असताना अनेक शिवसैनिक मला भेटायला येत होते. सत्तेत नसलेला आणि नेहमी फिल्डवर असलेला शिवसैनिक हा कुठेही गेलेला दिसत नाही. ज्यांनी सत्ताबदल करण्याची पावले टाकली, त्या लोकांच्या बाबतीत शिवसैनिक वेगळ्या मनस्थितीत आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
आमदार सोडून गेले तरी...
अनेकजण मला बोलले की, ४० मधील एक-दोन अपवाद सोडले तर एकही जण निवडून येणार नाही. सामान्य माणसाला ही गोष्ट आवडलेली नाही. शिवसेनेचे आमदार जरी गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि आपली शक्ती एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल, अशी साद शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना घातली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे मुंबई मनपाची सत्ता राखण्याचे आव्हान यावेळी शिवसेनेसमोर असणार आहे. यातच महाविकास आघाडी मुंबई मनपाला एकत्रितरित्या सामोरे जाणार का? याबाबतही अद्याप कोणतीच स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना कुणी सोबत येतेय की नाही याची वाट पाहात बसू नका आणि प्रत्येक वॉर्डात तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.