Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे आणखी भक्कम होतील, शिवसेना आणखी जोमाने वाढेल”; शरद पवारांना ठाम विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 09:03 AM2022-10-11T09:03:37+5:302022-10-11T09:04:23+5:30
Maharashtra News: चिन्ह गेल्यामुळे शिवसेनेला फारसा फरक पडणार नाही, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, यानंतर शिवसेनेला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. तर शिवसेनेला नवीन नावही मिळाले आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपही तीव्र झालेले आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेनेचे समर्थन केले आहे. शिवसेना आणखी जोमाने वाढेल, असा ठाम विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्याबाबत शरद पवारांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, चिन्ह गेल्यामुळे शिवसेनेला फारसा फरक पडणार नाही. अशा प्रकारांनी शिवसेना संपेल असे जर कुणाला वाटत असेल तर ते चुकीचे होईल. उलट उद्धव ठाकरे आणखी भक्कम होतील. शिवसेना आणखी जोमाने वाढेल, असे त्यांनी सांगितले.
मला हा निर्णय अपेक्षित होता, त्यामुळे आश्चर्य वाटले नाही
आतापर्यंत पाच चिन्हे घेऊन निवडणुका लढलो आणि जिंकलोही. चिन्ह नसल्याने काही फरक पडत नसतो. मला हा निर्णय अपेक्षित होता, त्यामुळे आश्चर्य वाटले नाही. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवून त्यांना शिवसेना हे नाव वापरण्यास निवडणूक आयोगाने तात्पुरती परवानगी नाकारली आहे. चिन्ह गोठवले म्हणून घाबरण्याचे कारण नाही. त्याने काही फरक पडत नाही. मी स्वत: यातून गेलो आहे. बैलजोडी, गाय-वासरू, चरखा, पंजा आणि घड्याळ अशी पाच चिन्हे घेऊन मी निवडणुका लढलो आणि जिंकलो, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, या निर्णयाचा महाविकास आघाडीवरही कोणताही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडी कायम एकत्र राहणार आहे. आता शिवसेनेने निवडणुकांना समोरे जायची तयारी अगोदर केली पाहिजे. लोक ठरवतात कोणाला निवडून द्यायचे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"