केतकी चितळेला ओळखत नाही! 'त्या' आक्षेपार्ह पोस्टवर शरद पवार मोजकंच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 06:56 PM2022-05-14T18:56:46+5:302022-05-14T19:01:40+5:30
शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेला पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुंबई: राष्ट्र्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसी कारवाईची माहिती दिली. या सर्व प्रकरणावर शरद पवारांनी मोजक्या शब्दांत भाष्य केलं.
केतकी चितळे नावाच्या अभिनेत्रीनं तुमच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिली आहे, असं शरद पवारांना पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. केतकी चितळेला ताब्यात घेण्यात आल्याची माहितीदेखील पवारांना देण्यात आली. त्यावेळी अशा नावाच्या कोणत्याही व्यक्तीला मी ओळखत नाही, असं पवारांनी सांगितलं.
केतकी चितळे नावाची व्यक्ती माहीत नाही आणि तिनं काय केलं आहे याचीदेखील मला कल्पना नाही. तिनं काय केलं हेच माहीत नसताना त्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असं शरद पवार म्हणाले. काही दिवसांपूर्वी एका सभेत कवी जवाहर राठोड यांच्या एका कवितेचा संदर्भ दिला. त्याबद्दल वेगळं चित्र काहींकडून मांडलं गेल्याचं पवारांनी सांगितलं.
राज ठाकरेंकडून केतकी चितळेचा समाचार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केतकीच्या पोस्टवर सडकून टीका केली आहे. या लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही, अशा शब्दांत राज यांनी केतकीच्या पोस्टवर भाष्य केलं आहे. एक पत्रक ट्विट करत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. 'कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दांत काहीतरी श्लोकांसारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे अस नाव टाकले आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो,' असं राज यांनी पत्रकात म्हटलं आहे.
'कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दांत काहीतरी श्लोकांसारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे अस नाव टाकले आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो,' असं राज यांनी पत्रकात म्हटलं आहे.