'गड-किल्ल्यांवर दारूची दुकानं अन् छमछम, हा शिवबांचा महाराष्ट्र नव्हे'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 10:07 PM2019-09-18T22:07:06+5:302019-09-18T22:15:01+5:30

शरद पवारांची भाजपा-शिवसेना सरकारवर सडकून टीका

ncp chief sharad pawar slams devendra fadnavis led state govt | 'गड-किल्ल्यांवर दारूची दुकानं अन् छमछम, हा शिवबांचा महाराष्ट्र नव्हे'

'गड-किल्ल्यांवर दारूची दुकानं अन् छमछम, हा शिवबांचा महाराष्ट्र नव्हे'

Next

लातूर : गड-किल्ल्यांवर दारूची दुकाने थाटण्याचा निर्णय सत्ताधारी घेतात. उद्या छमछमही म्हणाल. हा असला शिवबांचा महाराष्ट्र असू शकत नाही. त्यामुळे शौर्य अन् स्वाभिमानाच्या इतिहासाला धक्का लावणाऱ्यांना सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली.

लातूर येथे बुधवारी मुक्ताई मंगल कार्यालयात शरद पवार कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. ते म्हणाले, गड-किल्ले आपला स्वाभिमान आहे. तिथे काही मोडनिंब आणि चौफुला थाटायचा नाही. असले निर्णय करणाऱ्यांना धडा शिकवा. जे राज्यकर्ते संकटकाळी जनतेला मदत करू शकत नाहीत, त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. कोल्हापुरात पुराचे संकट उद्भवले. तिथे गावा-गावांत जाण्यापेक्षा मुख्यमंत्री हवाई सफर करून आले. लातूरला भूकंप झाला, त्या दिवशी गणेश विसर्जन होते. पहाटे ४ वाजता खिडकीची तावदाने वाजली. मला शंका आली, हा भूकंप तर नसेल. मी कोयनेवरील भूकंप मापन केंद्रात संपर्क केला. किल्लारीत भूकंप झाल्याचे कळले. त्याच क्षणी लातूरला निघण्याचा निर्णय घेतला. पहाटे ६ वाजता मुंबईच्या विमानतळावर होतो आणि ७.१५ वाजता किल्लारीत पोहोचलो. परिस्थिती भयंकर होती. १५ दिवस तळ ठोकून थांबलो. ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. अन् सत्ताधारी  मला विचारतात, शरद पवारांनी काय केले?

पहिली शेतकरी आत्महत्या झाली, त्यावेळी मला झोप आली नाही. मी पंतप्रधानांकडे गेलो आणि उद्योगपतींचे कर्ज माफ होते. शेतकऱ्यांचे का नाही, हा सवाल करून ७१ हजार कोटींची कर्जमाफी आणली. आताच्या कर्जमाफीचे आकडे मोठे सांगितले जातात. मात्र ५० टक्के लोकांनाही लाभ पोहोचला नाही, असं पवार म्हणाले.

तरुणांच्या हाताला काम देण्यात सरकार अपयशी ठरले असा आरोप करत पवार म्हणाले, मुंबईतल्या १२० पैकी १०० कापड गिरण्या बंद पडल्या. हे चित्र मुंबईतच नाही, तर छोट्या गावांपर्यंत आहे. अनेक उद्योग बंद पडत आहेत. नोकऱ्या जात आहेत. नवीन नोकऱ्या मिळत नाहीत, असेही ते म्हणाले.

झोपेतही शरद पवार.. शरद पवार...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वर्षांत काय केले, हे सांगायला निघाले. काय केले ते पाच मिनिटांत सांगतात अन् सगळे भाषण माझ्यावर करतात. मी चौदावेळा निवडून आलोय. आता मला निवडणूक लढवायची नाही. व्यक्तिश: या निवडणुकीत रस नाही. परंतु, मला कर्तृत्ववान तरुण पिढीच्या हातात महाराष्ट्र द्यायचा आहे. मात्र सत्ताधारी सारखे शरद पवार.. शरद पवार... करतात. अगदी झोपेत सुद्धा...

नागपूर गुन्हेगारांची राजधानी...
नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. किंबहुना ती गुन्हेगारांची राजधानी बनली आहे. तिकडे लक्ष द्या. मला आश्चर्य वाटते राज्यकर्त्यांना झोप कशी काय लागते? आपल्या गावात सामान्य माणूस सुरक्षित राहिला पाहिजे.

जे गेले, ते निवडून येणार नाहीत...
विकासासाठी चाललो म्हणून जे गेले, त्यांच्याच हातात सत्ता दिली होती. १९८० साली सुद्धा आम्ही ५८ होतो. त्यातील ५२ जण सोडून गेले होते. म्हणजेच मी पाच आमदारांचा विरोधी पक्षनेता होतो. त्यावेळी सुद्धा पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरलो अन् ५२ च्या ५२ पडले. त्यावेळी चार वर्षांचा कालावधी लागला. आता महिन्यातच त्यांचा निकाल लागणार आहे.
 

Web Title: ncp chief sharad pawar slams devendra fadnavis led state govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.