Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंनी वेगळा पक्ष काढावा, धनुष्यबाणावर दावा सांगू नये”; शरद पवारांनी चांगलंच सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 01:31 PM2022-08-10T13:31:24+5:302022-08-10T13:32:48+5:30
Maharashtra Political Crisis: धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह असून, पक्षाचे चिन्ह काढून घेणे योग्य नाही, असे सांगत शरद पवारांनी शिंदे गटाचे कान टोचले.
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठकांचा सपाटा लावल्याचे दिसत असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. निष्ठा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरे सुरू केले आहेत. दुसरीकडे शिंदे गटाला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. यातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जात असून, आम्ही मूळ शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकनाथ शिंदे गटाला चांगलेच सुनावले आहे.
शरद पवार यांनी शिवसेनेच्या चिन्हावरून शिंदे यांचे कान टोचले आहेत. त्यांनी काँग्रेस सोडल्यानंतर काय केले होते, याचे उदाहरणही दिले आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणे योग्य नाही. जर एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर वेगळा पक्ष काढू शकतात. जेव्हा मी काँग्रेसमधून बाहेर पडलो तेव्हा वेगळा पक्ष काढला. वेगळे चिन्ह घेतले. त्यांचे चिन्ह आम्ही मागितले नाही. त्याच्यातून वादविवाद वढवणे योग्य नाही, असे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हर घर तिरंगा मोहिमेला आम्हा सगळ्यांची साथ
केंद्रातील मोदी सरकारच्या हर घर तिरंगा मोहिमेवरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रीय कमिटी आहे. त्याचा मी सदस्य आहे. त्यात हर घर तिरंगा मोहिमेची चर्चा झाली. हा पक्षीय कार्यक्रम नाही. यात आम्हा सगळ्यांची त्यांना साथ आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. तसेच संसद चालवण्याची आस्था केंद्र सरकारला आहे, असं गेल्या काही वर्षातून वाटत नाही, असा टोला लगावत, केंद्राकडून चर्चेचे मार्ग बंद केले जात असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला.