"भाजपा मनसेला आपल्या तालावर नाचवत आहे"; राष्ट्रवादीच्या नेत्याचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 04:48 PM2022-05-11T16:48:45+5:302022-05-11T16:50:55+5:30
NCP Clyde Crasto Slams MNS And BJP : राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी यावरून मनसेवर जोरदार निशाणा साधला आहे.
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्यावरून भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज यांच्याविरोधात मोट उभी केली आहे. उत्तर प्रदेशात राजकारण चांगलेच तापले असताना अयोध्येत जाऊन कुणीही श्रीरामाचे दर्शन घेऊ शकतो अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. ब्रिजभूषण यांनी केलेल्या विरोधाचे कारण आपणाला माहीत नसून त्यांच्याशी आपले काहीही बोलणे झाले नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी यावरून मनसेवर जोरदार निशाणा साधला आहे.
"भाजपा मनसेला आपल्या तालावर नाचवत आहे" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्याला विरोध हा 'नूरा कुस्ती' सारखा दिसत आहे. आधी घोषणा, नंतर भाजपा खासदार ब्रिजभूषण यांचा विरोध, नंतर देवेंद्र फडणवीस जी "विरोध करू नका" सांगतात आणि त्यानंतर लगेचच मूक मनसे "अयोध्या दौरा होणार" ही घोषणा करते. भाजपा त्यांना आपल्या तालावर नाचवत आहे" असं क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राज ठाकरे यांचा अयोध्या दौर्याला विरोध हा 'नूरा कुस्ती' सारखा दिसत आहे. आधी घोषणा, नंतर #भाजप खासदार ब्रिज भूषण यांचा विरोध, नंतर देवेंद्र फडणवीस जी "विरोध करू नका" सांगतात आणि त्यानंतर लगेचच मूक #मनसे "अयोध्या दौरा होणार" ही घोषणा करते.
— Clyde Crasto - क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) May 11, 2022
भाजप त्यांना आपल्या तालावर नाचवत आहे.
नाशिकमध्ये खासगी कार्यक्रमासाठी आलेले फडणवीस यांनी राज यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी सावध भूमिका मांडली. उत्तर प्रदेशात राज ठाकरे यांना उघडपणे विरोध सुरू असून जनसमुदाय रस्त्यावर उतरला आहे. याविषयी त्यांना विचारले असता अयोध्येत श्रीरामाच्या चरणी कुणीही जाऊन दर्शन घेऊ शकतो इतकीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाच्या गुन्ह्याविषयी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं. हनुमान चालिसा म्हणणे हा राजद्रोह होऊ शकत नाही. सध्या राज्यात अनाचार सुरू असून मनमानी पद्धतीने दडपशाही सुरू असल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात आम्ही लढतच आहोत राज ठाकरे यांनी देखील लढले पाहिजे असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.