आघाडीस राष्ट्रवादी-काँग्रेस अनुकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2017 02:03 AM2017-01-17T02:03:20+5:302017-01-17T02:03:20+5:30

काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्यासंदर्भात चर्चा करण्यास सकारात्मकता दर्शविली आहे.

NCP-Congress alliance is friendly | आघाडीस राष्ट्रवादी-काँग्रेस अनुकूल

आघाडीस राष्ट्रवादी-काँग्रेस अनुकूल

Next


पिंपरी : महापालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर समविचारी पक्षाशी आघाडी करण्यासंदर्भात आदेश मिळाल्याने काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्यासंदर्भात चर्चा करण्यास सकारात्मकता दर्शविली आहे. आघाडीबाबत राष्ट्रवादीकडून प्रस्ताव मागविण्यात आला असून, त्यानंतर लवकरच चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. महापालिकेच्या सत्तेत काँग्रेस भागीदार असून, विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्यात आघाडीसंदर्भात चर्चा झाली होती. त्यानंतर महापालिकेच्या वर्तुळात पक्षप्रवेशाच्या अनेक घडामोडी झाल्याने चर्चा थांबली होती. शिवाय काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या एका गटाने राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची चर्चा बारगळली होती.
दरम्यान, प्रदेशपातळीवरही आगामी महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या आघाडीविषयी बैठका सुरू आहेत. शिवाय स्थानिक परिस्थिती पाहून आघाडीच्या सूचना प्रदेशपातळीवरून शहराध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत. गेल्या चार महिन्यांपासून काँग्रेस आघाडीची चर्चा थंडावली असलीतरी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा युतीचा चर्चा सुरू आहे.
स्थानिक पातळीवर निर्णय...
महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर चर्चेचे अधिकार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना दिले आहेत. त्यानुसार शहराध्यक्ष सचिन साठे यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. सोमवारी रात्री दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली. त्यात दोन्ही पक्ष आघाडी करण्यास उत्सुक असून, काँग्रेसने राष्ट्रवादीसमोर आणि राष्ट्रवादीने काँग्रेससमोर प्रस्ताव देण्याविष़यी चर्चा झाली. पहिल्या टप्प्यात आघाडीची, त्यानंतर जागांसंदर्भात चर्चा होणार आहे.
>‘त्या’ जागांवरून युतीची बैठक ठप्प
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती व्हावी यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रयत्नशील आहे. मात्र, पिंपळे गुरव, सांगवी, चिंचवड, थेरगाव, वाकड, भोसरी परिसरातील जागांचा दोन्ही पक्षांचा तिढा सुटलेला नाही. या जागा कोणाला द्यायच्या याबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.
शिवसेना-भाजपा युती झाल्यास महापालिकेत युतीची सत्ता येऊ शकते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांचे कान टोचण्याचे काम संघाने सुरू केले आहे. शिवसेना आणि भाजपा अशा दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचे राजकारण खेळले जाऊ नये. त्याचा फटका युतीला बसू नये यासाठी संघ दक्ष आहे.
मतभेद बाजूला ठेवून सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे, भाजपाकडून खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे यांच्यात चर्चा सुरू आहे. ताकतीनुसार जागा मिळाव्यात अशी मागणी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. सुरुवातीला भाजपाने शिवसेनेसमोर साठ-चाळीस असा जागांचा प्रस्ताव ठेवला होता. त्यास शिवसेनेच्या नेत्यांचा विरोध आहे. त्यानंतर पंचावन, पंचेचाळीस असाही प्रस्ताव ठेवला आहे. त्यावरही निर्णय झालेला नाही. ताकत पाहून जागा मिळाव्यात, अशी दोन्ही पक्षांची मागणी आहे. भोसरी गावठाण, पिंपळे गुरव, सांगवी, चिंचवड, प्राधिकरण परिसरातील जागांची मागणी भाजपाने केली आहे. तर सेनेने थेरगाव, वाकड, पिंपरी, चिंचवड, ताथवडे, प्राधिकरण, निगडी, चऱ्होली, मोशी, दिघी परिसरातील जागांची मागणी केली आहे.
भोसरी, चिंचवड, पिंपरी या तीनही मतदारसंघातील प्रभागांनुसार चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांनी स्वतंत्ररीत्या केलेल्या सर्वेक्षणाची पडताळणी केली जात आहे. तसेच विद्यमान नगरसेवक आहेत, त्या जागा दोन्ही पक्षांनी मागितल्या आहेत. चिंचवडगाव, निगडी परिसर आणि प्राधिकरण, समाविष्ट गावांपैकी दिघी, चऱ्होली, मोशी या भागांतील जागांवर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. बुधवारी युतीच्या प्रश्नावर नेत्यांची बैठक होणार आहे.

Web Title: NCP-Congress alliance is friendly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.