अकोल्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर गोळीबार!
By admin | Published: July 12, 2014 01:04 AM2014-07-12T01:04:47+5:302014-07-12T01:05:48+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजय रामदास रामटेके यांच्यावर देशकट्टा व तलवारींनी प्राणघातक हल्ला.
अकोला : अकोला महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजय रामदास रामटेके यांच्यावर देशकट्टा व तलवारींनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात रामटेके गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामटेके यांची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी, त्यांचा उजवा हात कापावा लागल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
नगरसेवक अजय रामटेके यांच्यासह मोहम्मद फजलू पहेलवान व त्यांचे ना तेवाईक रसूल खान हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीसाठी मुंबईला गेले होते. ते शुक्रवारी सकाळी मुंबई हावडा मेलने अकोल्यात पोहोचले. तिघेही ऑटोरिक्षाने जुने शहरातील गुलजारपुर्याकडे जात असताना, दामले चौकात आधीपासूनच दबा धरून बसलेल्या ६ आरोपींनी ऑटोरिक्षा अडविली. त्यानंतर आरोपींनी देशी कट्टय़ाने अजय रामटेके यांच्या दिशेने दोन गोळय़ा झाडल्या. पहिली गोळी रामटेके यांच्या उजव्या खांद्याला स्पर्श करून गेली. आरोपींनी लगेच दुसरी गोळी झाडली. ही गोळी रामटेके यांच्या खांद्याला लागली. त्यानंतर रामटेके जीव वाचविण्यासाठी ऑटोरिक्षाच्या बाहेर पडले; परंतु आरोपींनी त्यांना घेरून डोक्यावर, हात आणि पायांवर तलवारीने घाव घातले. रामटेके रक्ताच्या थारोळय़ात पडल्यानंतर आरोपी पळून गेले. हल्ल्याच्यावेळी आरोपी व रामटेके यांच्यात चांगलीच झटापट झाली. यात रामटेके यांचे दोन्ही हात व मांडीवर गंभीर दुखापत झाली. त्यांचा उजवा हात पूर्णत: निकामी झाला. अचानक झालेल्या या हल्ल्याने भयभीत झालेले नगरसेवक मोहम्मद फजलू व रसूल खान हे रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या दिशेने धावले. त्यांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर पोहोचून रामटेके यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी, या प्रकरणाला पूर्ववैमनस्याची किनार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. याप्रकरणी ६ आरोपींवर भादंविचे कलम ३0७ (प्राणघातक हल्ला) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिघांना संशयावरून ताब्यात घेतले आहे. २८ मे २0१२ रोजी रामटेके यांच्यावर अशाच प्रकारे गोळीबार झाला होता. त्यावेळी एक गोळी त्यांच्या कानाशिलाजवळ आणि दुसरी मांडीत घुसली होती.