ऐरोलीत राष्ट्रवादीच्या नगरसेविकेला मारहाण
By admin | Published: October 22, 2014 05:59 AM2014-10-22T05:59:35+5:302014-10-22T05:59:35+5:30
दिघा येथील प्रभाग ४ च्या नगरसेविका अॅड. अपर्णा गवते मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ऐरोली सेक्टर ८ येथील ‘डी मार्ट मॉल’मध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या
नवी मुंबई : राष्ट्रवादीच्या नगरसेविका अॅड. अपर्णा गवते यांना मारहाण झाल्याची घटना ऐरोली येथे घडली आहे. तीन अज्ञात तीन महिला व दोन पुरुषांनी हा हल्ला केला आहे. त्यापैकी एका महिलेला अटक करण्यात अली असून, अनिता बाराते असे तिचे नाव आहे.
दिघा येथील प्रभाग ४ च्या नगरसेविका अॅड. अपर्णा गवते मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ऐरोली सेक्टर ८ येथील ‘डी मार्ट मॉल’मध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. रस्त्यालगत गाडी उभी करून त्या मॉलमध्ये जात असतानाच तीन अज्ञात महिलांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचे कारचालक बुद्धेश गौडा धावून गेले. परंतु या वेळी तेथेच उभ्या असलेल्या दोन व्यक्तींनी गौडा यांनाही मारहाण केली. त्यापैकी एकाकडे पिस्तूल होते, असे गवते यांचे म्हणणे आहे. अखेर गवते यांचा मुलगा अथर्व याने ओरडून नागरिकांना मदतीसाठी बोलावले. त्यामुळे मारहाण करणाऱ्या महिला व पुरुषांनी तेथून पळ काढला. त्यापैकी एका महिलेला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
अनिता बाराते असे या महिलेचे नाव असून ती उल्हासनगरची रहिवासी आहे, तर पळून गेलेले इतरही उल्हासनगरचेच आहेत. त्यांच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख गोजरे यांनी सांगितले. या प्रकारानंतर अपर्णा गवते यांची पालिका रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना फोर्टीस रुग्णालयात दाखल केले आहे. परंतु या हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याचे अपर्णा गवते यांचे पती नगरसेवक नवीन गवते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)