कर्जमुक्ती योजनेची यादी जाहीर होणार म्हणून विरोधकांना "पोटशूळ" उठला : राष्ट्रवादी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 04:24 PM2020-02-24T16:24:35+5:302020-02-24T16:26:04+5:30
अवघ्या राज्याचे लक्ष्य लागलेल्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी विधानपरिषद सभागृहात जाणीवपूर्वक गदारोळ केला.
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच ठाकरे सरकारनं शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात आलं आहे. तर कर्जमुक्ती योजनेची यादी जाहीर होणार म्हणून विरोधकांना "पोटशूळ" उठला असल्याचा टोला राष्ट्रवादी पक्षाने भाजपला लगावला आहे.
"महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने सादर करण्यात येणारा यंदाचा अर्थसंकल्प सर्व समाजघटकांना न्याय देणारा आहे. यातच आज कर्जमाफी मिळणाऱ्या शेतकऱ्यांची पहिली यादी विधानसभेत जाहीर होणार म्हटल्यानंतर आज सकाळपासूनच विरोधकांना पोटशूळ उठला. 'सौ चुहे खाके, बिल्ली चली हज को', अशा आविर्भावात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे आमदार यांनी विधानभवनात प्रवेश करताच रंग दाखवला असल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाने केला आहे.
तर अवघ्या राज्याचे लक्ष्य लागलेल्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी विधानपरिषद सभागृहात जाणीवपूर्वक गदारोळ केला. या गोंधळातच पुरवणी मागण्या पटलावर मांडाव्या लागल्या आणि विधानपरिषदेचे कामकाज तेराव्या मिनिटालाच गुंडाळावे लागले. विरोधकांकडून सहकार्याची अपेक्षा होती. पण विरोधक सदस्यांकडून झालेला गोंधळ विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाला अशोभनीय आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करू असे सांगणाऱ्या फडणवीस सरकाने शेतकऱ्यांना फसवले नसते तर आज पायऱ्यांवर बसून रंग दाखवण्याची ही वेळ आली नसती, असा टोलाही यावेळी राष्ट्रवादीने भाजपला लगावला.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी विधानसभेत जाहीर होणार म्हटल्यावर विरोधकांना पोटशूळ उठला. सौ चुहे खाके बिल्ली चली हज को, अशा आविर्भावात माजी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis आणि भाजपाचे आमदार यांनी विधानभवनात प्रवेश करताच रंग दाखवला. pic.twitter.com/aMN7pa24ZH
— NCP (@NCPspeaks) February 24, 2020